रामेश्वर-गांगेश्वर वार्षिक ‘देवभेट’ सोहळा उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व महान गावाचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर या देवतांचा वार्षिक पारंपारिक देवभेट सोहळा महान गावी उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी रयतेच्या रक्षणासाठी श्री देव गांगेश्वर देवालयातून दिले जाणारे वार्षिक राखणीचे श्रीफळ बारापाच मानकऱ्यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या दोन्ही देवतेच्या भेटीच्या सोहळ्यानिमित्त भाविक भक्तांची महान गावी गर्दी झाली होती.

कांदळगावचे श्री देव रामेश्वर देवस्थानचे मानकरी शनिवारी सकाळी ढोल, ताशा, अशा सवाद्य लवाजम्यासह महान या गावी आली. सकाळी महान गावचे ग्रामदैवत श्रीदेव गांगेश्वर देवाची विधिवत पूजा, अभिषेक, राखावालीच्या श्रीफाळाचे पूजन व दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. दुपारी श्री देव गांगेश्वाराला रखवालीचे श्रीफळ नेण्यासाठी कौल प्रसाद घेण्यात आला. यावेळी श्रीदेव रामेश्वर- श्री देव गांगेश्वर यां देवतेच्या शिवकळेद्वारे उपस्थित भक्तांची गाऱ्हाणी ऐकून अडीअडचणीचे निराकरण करण्यात आले. भक्तांच्या समस्यांचे निरसण झाल्यानंतर महान गावचे ग्रामदैवत गंगेश्वर महान गावाची सीमाबांधणी करण्यासाठी शिवकळेसह राईफेरीसाठी निघाली. गावाची सीमा बांधणी झाल्यावर वार्षिक रक्षणाचे श्रीफळ मानकरी यांच्याकडे देण्यात आले. भक्तांना रामेश्वर व गांगेश्वर या देवतेकडून वर्षभरासाठी प्रसाद म्हणून पाल्याचे अन्न देण्यात आले. महान गावातून कांदळगावी नेण्यात आलेले रखवालीचे श्रीफळ येथील सातेरी देवीच्या देवालयात नवरात्रीउत्सवात पूजनासाठी ठेवण्यात येणार आहे. दसरा उत्सवात हे श्रीफळ बरापाच मांडावर आणण्यात येणार आहे.