पाळीव कुत्र्याच्या वादातून मारहाण, पुण्यात चौघांवर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुत्र्याच्या कारणातून दोन परिवारात वाद झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. चौघांनी एका व्यक्तीला लोखंडी पाईप व खोर्‍याने मारहाण करून त्याच्या पत्नीला देखील धक्काबुक्की केली. यावेळी पत्नीचे मंगळसूत्र गहाळ झाले असून, संबंधीत व्यक्तीच्या खिशातील 14 हजाराची रोकड काढून घेण्यात आली आहे.

या प्रकरणी विजय सोपान कलबंड (वय. 29, रा. केसनंद तळेरानवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण साळुंके, करण साळुंके, विजय शेखर पवार व एक महिला अशा चौघांच्या विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार केसनंद तळेरानवाडी येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. आरोपींनी फिर्यादीसोबत त्यांनी पाळलेल्या कुत्र्यावरून वाद केली. यावेळी किरण आणि करण या दोघांनी विजय यांना खोर्‍याने व लोखंडी पाईपाने मारहाण केली. तसेच फिर्यादींच्या पत्नीच्या केसाला ओढून धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले. तर किरण याने विजय यांच्या खिशातील 14 हजार रुपयांची रोकड काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.