हिटमॅनचा रांचीत हंगामा

477

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने दिवाळीआधीच चौकार-षटकारांची आतषबाजी करीत रांचीत आपले कसोटीतले पहिले द्विशतक झळकावले. रोहित आणि अजिंक्य या मुंबईकरांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱया आणि अखेरच्या कसोटी क्रिकेट लढतीचा दुसरा दिवसही आपल्या शतकी खेळींनी गाजवला. ‘हिटमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱया रोहितने वन डेप्रमाणे कसोटीतही आपल्या पराक्रमाचा झेंडा रोवताना 255 चेंडूंमध्ये 212 धावा कुटल्या. यात 6 षटकार आणि 28 चौकारांचा समावेश आहे. तिसऱयांदा रोहितने दीडशतकी खेळी केली आहे. याआधी 177 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने ही खेळी केली होती. मुंबईकर रहाणेनेही 169 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि एक षटकार ठोकत आपल्या कारकीर्दीतील 11 वे शतक ठोकले. घरच्या मैदानावरील हे त्याचे चौथे तर तीन वर्षांनंतर फटकावलेले पहिले शतक आहे. दुसऱया दिवसअखेर पाहुण्या दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज वेगवान गोलंदाजीपुढे पार गळपटले. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अफलातून बाऊन्सरवर सलामीवीर डीन एल्गरला शून्यावरच तंबूत परतवले तर उमेश यादवने उसळत्या चेंडूवर क्विंटन डिकॉकला 4 धावांवरच तंबूचा रस्ता दाखवला. पाहुण्यांचा पहिला डाव 2 बाद 9 अशा केविलवाण्या स्थितीत होता. ते अद्याप 488 धावांनी पिछाडीवर आहेत.

हिंदुस्थानने आपला पहिला डाव 497 धावांवर घोषित केल्यानंतर आफ्रिकेची सलामीची जोडी मैदानात आली. मात्र मोहम्मद शमी आणि उमेश यादव या वेगवान जोडीने खेळपट्टीचा फायदा घेत उसळते चेंडू टाकत आफ्रिकेच्या फलंदाजांना हैराण केले. अखेरीस डीन एल्गर आणि क्विंटन डी कॉक हिंदुस्थानच्या जाळ्यात अडकले. यानंतर पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. यावेळी दक्षिण आफ्रिकेची अवस्था 2 गडी बाद 9 अशी झाली होती.

षटकाराने शतक आणि द्विशतकही पूर्ण केले

रोहितने 95 धावांवर असताना पिडीटच्या गोलंदाजीवर षटकार खेचत शतक झळकावले, तर दुसऱया दिवशी उपाहाराच्या सत्रानंतर एन्गिडीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपले पहिले द्विशतक झळकावले. या खेळीने एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. कसोटी मालिकेत हिंदुस्थानी फलंदाजाकडून झळकावलेले हे तिसरे द्विशतक ठरले आहे. एका कसोटी मालिकेत हिंदुस्थानच्या 3 फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

रोहित महान सलामीवीरांच्या पंक्तीत

कसोटीतील आपल्या द्विशतकी खेळीसह 500 धावांचा पल्ला पार करणारा रोहित शर्मा हा हिंदुस्थानचा पाचवा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. आपल्या पराक्रमाने त्याने विनू मंकड, बुधी कुंदरन, सुनील गावसकर आणि वीरेंद्र सेहवाग या महान हिंदुस्थानी सलामीवीरांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. याशिवाय वन डे आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारांत द्विशतक झळकावणारा रोहित जगातला चौथा फलंदाज ठरला आहे. याआधी असा पराक्रम सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल या स्टार फलंदाजांनी केला आहे.

ब्रॅडमन यांचा 71 वर्षांचा विक्रम रोहितकडून मोडीत

रोहित शर्माने आपल्या द्विशतकी खेळीसह मायदेशी कसोटीत सर्वाधिक सरासरीने धावा जमविण्याचा क्रिकेटसम्राट सर डॉन ब्रॅडमन यांचा 71 वर्षे अबाधित असलेला विक्रम आज मोडीत काढला. ब्रॅडमन यांनी मायदेशातील कसोटींत 98.22 या सरासरीने धावा जमवल्या होत्या. महान ब्रॅडमन यांचा हा विक्रम मोडीत काढताना रोहितने मायदेशात 99.84 च्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत.

रोहितकडून विक्रमांचा पाऊस
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत रोहितने तिसरे शतक झळकावले आहे. तिसऱया कसोटीच्या पहिल्या डावात 212 धावा करणाऱया रोहितच्या आता एकूण 529 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा हिंदुस्थानी फलंदाज होण्याचा मान त्याने मिळवला आहे. त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनलाही मागे टाकले आहे. त्याच्या नावावर 388 धावा होत्या. रोहित शर्माने या कसोटी मालिकेत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा, सर्वाधिक तीन शतके, सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावण्याचा पराक्रम त्याने केला आहे. आता 30 कसोटी सामन्यांत रोहितच्या नावावर एकूण सहा शतके नोंद झाली आहेत. तसेच 10 कसोटी अर्धशतकेही त्याने झळकावली आहेत.

संक्षिप्त धावफलक
हिंदुस्थान पहिला डाव 9 बाद 497 घोषित
रोहित शर्मा – 255 चेंडूंत 212 ( 28 चौकार, 6 षटकार ), अजिंक्य रहाणे ः 192 चेंडूंत 115 (17 चौकार, 1 षटकार), रवींद्र जाडेजा ः 119 चेंडूंत 51 (4 चौकार ) ; जॉर्ज लिंडे 133 धावांत 4 बळी, कागिसो रबाडा 85 धावांत 3 बळी; विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला डाव 2 बाद 9; मोहम्मद शमी 1 धावेत 1 बळी, उमेश यादव 4 धावांत 1 बळी.

आपली प्रतिक्रिया द्या