
>> राणी वर्मा
आपलं आवडतं दैवत? – आई-बाबा हेच माझं दैवत.
त्यांचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? –आईला मसाला-डोसा खायला घेऊन जायचो आणि सिनेमा बघताना पॉपकॉर्न घेऊन द्यायचो आणि वडील अलाहाबादी असल्यामुळे त्यांना मटण, कुल्फी, रोड हे खायला घालायचं. असं त्यांचं कौतुक करायचे.
संकटात ते तुम्हाला कशी मदत करतात, असं वाटतं? – आईचे गाण्याचे सतत कार्यक्रम असायचे. वडील सेन्सर बोर्डचे संचालक होते. सतत फिरतीवर असायचे. आई कार्यक्रम संपला की, आधी आम्हाला भेटायची. वडील कुठेही गेले तरी आमच्यासाठी छोटीशी वस्तू तरी आणायचेच. त्यांनी आम्हाला मुलांसारखं वाढवलं. आयुष्यात कोणत्याही प्रसंगाचा धीटाईने सामना करण्याची शिकवण त्यांनी दिली.
कला आणि भक्तीची सांगड कशी घालता? – आमच्यातली कला त्यांनी पूर्णपणे वाढू दिली. तिने माझ्या आवाजाला लाईट म्युझिक शोभेल म्हणून तेच गा, असा सल्ला दिला. वडिलांनी मला उर्दू भाषा शिकवली.
आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग? – कायम. सध्या मी ‘जश्ने उर्दू’ हा कार्यक्रम करतेय. तो मी वडिलांना समर्पित करते. त्यांनी माझ्यात उर्दू भाषेची आवड निर्माण केली. या कार्यक्रमामुळे लोकांना कळेल आम्हाला वाढवण्यात अमर वर्मांचाही मोठा वाटा आहे.
त्याच्यावर रागावता का? – कधीच नाही. तेही आमच्यावर कधीही रागावले नाहीत. वंदना आमच्यामध्ये मिश्किल. आई तिला एकदा ओरडली. त्यानंतर आईच रडायला लागली. तिलाच वाईट वाटलं. वडिलांनी आयुष्यात कोणावरही राग काढला नाही.
त्यांनी तुमचे लाड कसे पुरवले? – घरात मी शेंडेफळ. त्यामुळे माझे कौतुक आणि प्रेम जास्त असे. प्रेमाने मला सगळे राणी म्हणू लागले. माझं खरं नाव वेगळं असलं तरी आता सगळेच जण मला याच नावाने ओळखतात.
आवडत्या दैवताचे कोणते स्वरूप आवडते? – आईचं वर्णन ‘सर्वांगसुंदर परिपूर्ण सौंदर्यवती’ असं करीन. तिची सोज्वळ, सात्त्विक वृत्ती गाण्यातही दिसते. हेच तिचं रूप मला दैवतेसारखं वाटतं.
त्यांच्यापाशी काय मागता? – वयाच्या ७० व्या वर्षी दोघेही गेले. तरीही ते सतत आमच्याबरोबर आहेत, याची जाणीव आजही आम्हाला होते. पुढच्या जन्मीही त्यांच्याच पोटी जन्म मिळावा, हेच मी त्यांच्याकडे मागते.
त्यांची नियमित उपासना कशी करता? – आईची गाणी ऐकते आणि पप्पा सुरेख शायरी करायचे. त्यांचे पुस्तक आणि दोघांचाही फोटो माझ्याकडे कायम असतो. सकाळी मी त्यांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करते.



























































