
विदर्भला हवेत 4 विकेट आणि मध्य प्रदेश विजयापासून 93 धावा दूर
विदर्भ आणि मध्य प्रदेश यांच्यातील रणजी उपांत्य लढत नाटय़मय वळणावर येऊन ठेपली आहे. रणजी जेतेपदाच्या लढतीत मुंबईविरुद्ध भिडण्यासाठी दोघांना समान संधी असून विदर्भला हवेत फक्त 4 विकेट तर मध्य प्रदेश विजयापासून 93 धावा दूर आहे. सामन्याच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पहिल्या सत्रातच फैसला लागणार की मुंबई कोण गाठणार?
रणजी करंडकाचा पहिला उपांत्य सामना मुंबईने अडीच दिवसांतच संपवला होता. मात्र दुसरा उपांत्य सामना क्रिकेटला साजेसा थरार घेऊन आला आहे. पहिल्या डावात 82 धावांनी पिछाडलेल्या विदर्भने दुसऱया डावात यश राठोड आणि कर्णधार अक्षय वाडकरच्या 158 धावांच्या भागीच्या जोरावर मोठी मजल मारली. सोमवारच्या 6 बाद 343 या धावसंख्येत यश राठोडच्या खेळीमुळे आणखी 59 धावांची भर पडल्यामुळे विदर्भने मध्य प्रदेशसमोर 321 धावांचे जबर आव्हान दिले होते. त्यामुळे सामना थरारक होणार हे पहिल्या सत्रातच स्पष्ट झाले होते.
राठोडचे शतकी यश
4 बाद 137 अशी स्थिती असताना यश राठोड मैदानात आला होता. मग त्याने झुंजार खेळ करत कालच संघाला सुस्थितीत आणले होते. अर्धा संघ 161 धावात माघारी परतल्यावर राठोडला साथ लाभली ती कर्णधार अक्षय वाडकरची दोघांनी दीडशतकी भागी रचली होती. सोमवारी यश आपल्या पहिल्या शतकापासून केवळ 3 धावा दूर होता. त्याने सकाळी उतरताच आपले पहिलेवहिले रणजी शतक साजरे केले. आदित्य सरवटेबरोबर 58 धावांची भागी रचली, पण ही जोडी फुटल्यानंतर विदर्भचा शेपटाला संधी न देता त्याने आपल्याकडे स्ट्राइक घेत संघाला 402 धावांपर्यंत नेले. आज काढलेल्या 59 धावांमधील 43 धावा त्याच्या एकटय़ाच्याच होत्या. 200 चेंडूंत 18 चौकार आणि 2 षटकार खेचत तो सर्वात शेवटी बाद झाला. मध्य प्रदेशच्या अनुभव अगरवालने 92 धावांत 5 विकेट टिपल्या.
मध्य प्रदेशची दमदार सुरुवात अन् घसरगुंडी
मध्य प्रदेशला सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली नसली तरी सलामीवीर यश दुबे आणि तिसऱया क्रमांकावर आलेल्या हर्ष गवळीने शतकी भागी रचत मध्य प्रदेशची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. पण ही 67 धावांवर हर्ष बाद होताच विदर्भने सामना थरारक वळणावर नेण्याची किमया केली. अक्षय वखरेने मधल्या फळीला कापून काढत सामन्यात थरार आणला. त्यातच दिवस संपायला 5 मिनिटे असताना यश दुबे दुर्दैवीरीत्या धावचीत झाला आणि मध्य प्रदेशच्या हृदयाचे ठोके चुकले.
विदर्भ की मध्य प्रदेश?
दोन वर्षांपूर्वी आपले पाचवे रणजी जेतेपद जिंकणाऱया मध्य प्रदेशला गेल्या वर्षी अपयश आले होते. मात्र यावेळी ते विदर्भला हरवण्यात अपयशी ठरले तर ते 13 व्यांदा रणजी जेतेपदाची अंतिम फेरी गाठतील. तसेच दोनदा फायनलमध्ये खेळणाऱया विदर्भला अद्याप एकदाही अपयश आलेले नाही. ते दोनदा फायनलला पोचलेत आणि दोन्ही वेळेला जिंकलेत. यावेळी ते मध्य प्रदेशला हरवून तिसऱयांदा फायनल खेळू शकतात. दोन्ही संघांना समान संधी आहे. फक्त पाचव्या दिवसाचे पहिले सत्र कुणाच्या बाजूने असेल, तोच सामना जिंकेल.
























































