सौराष्ट्र-गुजरातमध्ये रंगतेय रोमहर्षक लढत, चिंतन गजाची अष्टपैलू चमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौराष्ट्र व गुजरात यांच्यामधील रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्य फेरीची लढत रंगतदार अवस्थेत असून दोन्ही संघांना विजयाची संधी निर्माण झाली आहे. पहिल्या डावात 304 धावा फटकावणाऱया सौराष्ट्राची दुसऱया डावात 5 बाद 66 धावा अशी अवस्था झाली असून आता त्यांचा संघ 118 धावांनी पुढे आहे. गुजरातचा मध्यमगती गोलंदाज चिंतन गजाने सौराष्ट्राचे पाच बळी गारद करून सामन्यात रंगत निर्माण केली आहे. याआधी त्याने अर्धशतक झळकवत गुजरातला पहिल्या डावात 252 धावांपर्यंत पोहचवले.

दुसरा डाव गडगडला

सौराष्ट्राच्या फलंदाजांनी दुसऱया डावात निराशा केली. चिंतन गजाच्या प्रभावी माऱयासमोर सौराष्ट्राच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही. आता चेतन सकारिया 32 धावांवर तर अर्पित वसावडा 23 धावांवर खेळत आहे. चिंतन गजाने 15 धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

कर्नाटकला विजयासाठी हव्यात 254 धावा

कर्नाटक व बंगाल यांच्यामध्येही चुरशीची उपांत्य लढत सुरू आहे. बंगालच्या 312 धावांना प्रत्युत्तर देताना कर्नाटकचा पहिला डाव 122 धावांमध्येच आटोपला, पण त्यानंतर बंगालला दुसऱया डावात फक्त 161 धावाच करता आल्यामुळे कर्नाटकला विजयाची थोडी आस निर्माण झाली. बंगालकडून मिळालेल्या 352 धावांचा पाठलाग करणाऱया कर्नाटकने तिसऱया दिवसअखेरीस 3 बाद 98 धावा केल्या असून आता त्यांना विजयासाठी आणखी 254 धावांची आवश्यकता आहे. अभिमन्यू मिथुनने चार फलंदाज बाद केल्यामुळे बंगालचा दुसरा डाव झटपट गारद झाला.

फलंदाजीतही ठसा

गुजरातने 6 बाद 119 या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. रुजुल भटने सहा चौकारांसह 71 धावांची खेळी साकारली, पण त्याला आपले शतक साजरे करता आले नाही. इतर फलंदाजांनाही सूर गवसला नाही. दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱया चिंतन गजाने चार षटकार व सहा चौकारांसह 61 धावा फटकावल्या. त्यामुळे गुजरातला पहिल्या डावात 252 धावा करता आल्या. चिंतन गजाने त्यानंतरही गोलंदाजीतही ठसा उमटवला.