शोध रणजी जेतेपदाचा – कर्नाटक जेतेपदाचा दुष्काळ संपवणार? 

गतवर्षी आपल्या रणजी जेतेपदाचा अनेक दशकांचा शोध संपविणारा मध्य प्रदेश यंदा ते राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उपांत्य लढतीत त्यांची गाठ आहे ती दोन वेळा रणजी करंडक जिंकणाऱ्या बंगालशी. दुसरीकडे रणजी इतिहासात मुंबईनंतर सर्वाधिक आठ जेतेपदे पटकावणारा कर्नाटक यंदा जोरदार कामगिरी करणाऱ्या सौराष्ट्रशी भिडणार आहे. मध्य प्रदेश सोडले तर कर्नाटक गेली आठ वर्षे जेतेपदाच्या शोधात आहे तर 12 वेळा रणजी करंडक हुकलेल्या बंगालचा 34 वर्षांचा रणजी जेतेपदाचा दुष्काळ संपता संपत नाहीय. सौराष्ट्रने आपले पहिलेवहिले जेतेपद तीन वर्षांपूर्वीच पटकावले होते. त्यामुळे जेतेपदाचा यशस्वी शोध कोणता संघ घेईल, याच्या पाऊलखुणा पुढील पाच दिवसांत दिसतीलच.

गेल्या आठवडय़ात झालेल्या रणजीच्या उपांत्यपूर्व फेरीत चारही यजमान संघ जिंकले होते. सौराष्ट्र आणि मध्य प्रदेशने पहिल्या डावातील शतकी पिछाडीनंतरही बाजी मारण्याची किमया साधली होती, तर कर्नाटक आणि बंगालने आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली होती. या चारही सामन्यांत कर्नाटकची कामगिरी सर्वात जबरदस्त होती. त्यांनी पूर्ण स्पर्धेत कधीही प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढू दिले नाही. त्यांनी आठपैकी पाच सामने जिंकले तर तीन सामने अनिर्णितावस्थेत संपले होते. त्यामुळे अन्य तीन संघांच्या तुलनेत कर्नाटकाची फलंदाजी आणि गोलंदाजी बळकट आहे. रविकुमार समर्थ आणि मयांक अगरवाल यांची बॅट धावांचा पाऊस पाडत असल्यामुळे कर्नाटक डावाने जिंकताहेत. समर्थने तीन शतकांसह 659 धावा काढल्यात, तर मयांकने 686 धावांचा पाऊस पाडलाय. मनीष पांडे, श्रेयस गोपाळ आणि देवदत्त पडिक्कलमुळे कर्नाटकची फलंदाजी आणखीन मजबूत झालीय. ही त्यांची अत्यंत जमेची बाजू आहे. विशाक, कावेरप्पा आणि गौतम यांच्या अचूक आणि सातत्यपूर्ण माऱ्यामुळे कर्नाटकची गोलंदाजीही फॉर्मात आहे. त्यामुळे सौराष्ट्रविरुद्ध कर्नाटकचे पारडे जड राहणार, हे कुणीही सांगेल. सौराष्ट्रच्या फलंदाजीत आणि गोलंदाजीत कुणाचेही सातत्य नसले तरी त्यांचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. हार्विक देसाई गेल्या दोन सामन्यांत चमक दाखवू शकला नसला तरी त्याने 3 शतके ठोकली आहेत. तसेच पार्थ भुत आणि अर्पित वसावडाने मोक्याच्या क्षणी उपयुक्त फलंदाजी करीत सौराष्ट्रला विजय मिळवून दिलेत. भुत आणि वसावडाच्या फलंदाजीमुळे सौराष्ट्रने गेल्या तीन सामन्यांत भन्नाट कामगिरी केल्यामुळे उद्या कर्नाटकविरुद्धही ते सौराष्ट्रला मजबूत स्थिती आणू शकतात.

जेतेपद राखण्यासाठी मध्य प्रदेश सज्ज

मध्य प्रदेश आणि बंगाल यांच्यातील लढतही जोरदार होईल. मध्य प्रदेशने गेल्या सामन्यात पंजाबला हरवताना जो खेळ दाखवला तो कौतुकास्पद होता. विशेषतः आवेश खानची गोलंदाजी. त्यातच उद्याचा सामना इंदूरला होत असल्यामुळे घरच्या मैदानावर मध्य प्रदेश नेहमीच चांगला खेळत आलाय. बंगालची कामगिरी तितकी उत्साहवर्धक नाही. तरीही रणजी इतिहासात केवळ दोन जेतेपद जिंकलेल्या बंगालला नेहमीच उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. यंदा ही मालिका खंडित करायची असेल तर 728 धावा करणाऱ्या अभिमन्यू ईश्वरनला आणखी एक शतक ठोकावे लागणारच. गोलंदाजीत आकाश दीपला आपला सर्वोत्तम स्पेल मध्य प्रदेशविरुद्ध करावाच लागेल. मध्य प्रदेशही सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज झालाय. त्यामुळे रोमहर्षक लढतीत कोणता संघ जेतेपदाच्या शोधात यश मिळवितो, ते पुढच्या दोनतीन दिवसांतच कळेल.