
यंदा रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपासून विजयाचे आकडे काही वेगळेच होते. उपांत्यपूर्व फेरीत चारही यजमान संघ जिंकले तर उपांत्य फेरीत दोन्ही यजमान हरले. त्यामुळे 16 फेब्रुवारीपासून आता यजमान संघ जिंकेल, असे भाकित वर्तवले तर कुणाला आश्चर्य वाटणार नाही. गेल्या दोन्ही सामन्यांत बंगालने जे विजय नोंदविले आहेत त्यांची तुलना केली तर सौराष्ट्रपेक्षा बंगाल वरचढ ठरतो. त्यामुळे पंधराव्यांदा अंतिम फेरीत धडक मारणारा बंगालचा संघ 33 वर्षांनंतर पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व लढतीत बंगालने झारखंडला 9 विकेट्सनी धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली होती, तर उपांत्य सामन्यातही त्यांनी गतविजेत्या मध्य प्रदेशचा 306 धावांनी फडशा पाडला होता. या दोन्ही दिमाखदार विजयासह ते अंतिम फेरीत पोहोचले होते, मात्र सौराष्ट्रने दोन्ही सामन्यांत पिछाडीवरून मुसंडी मारली. उपांत्यपूर्व लढती पंजाबने 128 धावांची जबरदस्त आघाडी घेतली होती. तरीही सौराष्ट्रने 71 धावांनी विजयी मिळविला. उपांत्य लढतीतसुद्धा सौराष्ट्रला शेल्डन जॅक्सन आणि अर्पित वसावडाने शतकी खेळी करून सावरले. त्यांच्या खेळींमुळेच सौराष्ट्रला कर्नाटकला धक्का देता आला होता.
सध्या बंगालचे अनुस्तुप मजुमदार (790 धावा), संदीप घरामी (789) आणि अभिमन्यू ईश्वरन (782) जबरदस्त फॉर्मात आहेत तर सौराष्ट्रच्या कर्णधार अर्पित वसावडाने (826) जबरदस्त फलंदाजी केली आहे. गोलंदाजीत बंगालच्या आकाश दीपची कामगिरी भन्नाट झालीय. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीतही सौराष्ट्रपेक्षा बंगालचे पारडे जड आहे. सर्व गोष्टीही बंगालच्या बाजूने आहेत. ईडन गार्डनवर बंगालने जेतेपदाचा रणजी करंडक उंचवायला काही हरकत नाही. फक्त त्यांना जेतेपदाचा शोध संपवायचं असेल तर या मौक्यावर चौका मारावाच लागणार.
सर्वात दुर्दैवी संघ
रणजी करंडक स्पर्धेतला सर्वात दुर्दैवी संघ म्हणून बंगालचे नाव घेतले जाते. बंगालने आपले पहिले रणजी जेतेपद 1938-39 साली जिंकले होते. त्यानंतर तब्बल 50 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर म्हणजेच 1989-90 साली दुसऱयांदा रणजी करंडक जिंकता आले. या जेतेपदाला आता 33 वर्षे झाली आहेत. या 33 वर्षांत बंगालचा संघ चारवेळा अंतिम फेरीत पोहोचला, पण त्यांना कधीही जिंकता आले नाही. एकूण 12 वेळा बंगाल उपविजेता ठरलाय. सर्वाधिक उपविजेता अशा दुर्दैवी विक्रम बंगालच्या नावावर आहे. दुसऱया क्रमांकावर तामीळनाडू असून ते दहावेळा अंतिम सामन्यात हरले. त्याचप्रमाणे अंतिम फेरीत धडक मारण्याच्या यादीत फक्त मुंबईच बंगालच्या पुढे आहे. दिल्लीने 15 तर कर्नाटकने 14 वेळा अंतिम फेरी गाठलीय.
तीन वर्षांपूर्वीही यजमानच जिंकला होता…
तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यात रणजी करंडकाचा अंतिम सामना रंगतोय. 2019-20 साली सौराष्ट्रमध्ये झालेला ड्रॉ सामन्यात पहिल्या डावातील 44 धावांच्या आघाडीच्या जोरावर सौराष्ट्रने आपले पहिलेवहिले जेतेपद जिंकले होते. आता बंगाल इडनवर खेळतोय त्यामुळे बंगाल जेतेपदाचा बदला जेतेपद जिंकूनच घेण्यासाठी आसुसलेले आहेत.





























































