परमबीर सिंह यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांविरोधात दाखल गुह्याचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह व अन्य अधिकाऱयांविरोधात मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात खंडणीसह विविध कलमांन्वये दाखल दोन गुह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सात अधिकाऱयांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. दोन्ही गुह्यांची कागदपत्रे तत्काळ ताब्यात घेऊन लगेच तपास सुरू करण्याबाबत तपास पथकास निर्देश देण्यात आले आहेत.

‘ल’ विभागाचे पोलीस उपायुक्त निमीत गोयल यांच्या नेतृत्व व देखरेखीखाली विशेष तपास पथक गुह्यांचा तपास करणार आहेत. या ‘एसआयटी’मध्ये देवनार विभागाचे सहाय्यक आयुक्त एम. एम. मुजावर, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रीणम परब, खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय घोरपडे, युनिट- 5 चे सहाय्यक निरीक्षक महेंद्र पाटील आणि पश्चिम प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल गायकवाड या अधिकाऱयांचा समावेश आहे. एसीपी मुजावर हे मुख्य तपासी अधिकारी असतील तर उर्वरित अधिकारी सहाय्यक तपास अधिकारी म्हणून काम करणार आहेत.

उपायुक्त पराग मणेरे, अकबर पठाण ‘ल’ विभागात

मरीन ड्राइव्ह व ठाण्याच्या कोपरी पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह एका गुह्यात उपायुक्त पराग मणेरे तर दुसऱया गुह्यात उपायुक्त अकबर पठाण यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या गुह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ज्या अधिकाऱयांवर गुन्हा दाखल आहे त्यांना सध्याच्या नेमणुकीच्या ठिकाणी कार्यरत ठेवणे उचित ठरणार नसल्याने उपायुक्त पराग मणेरे, उपायुक्त अकबर पठाण, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील, सिद्धार्थ शिंदे व पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना पुढील आदेश येईपर्यत ‘ल’ विभागात संलग्न करण्यात आले आहे. या अधिकाऱयांचा पदभार अन्य अधिकाऱयांकडे सोपविण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या