
मादळमोही येथील एका व्यावसायिकाच्या दुचाकीला पाठीमागून धडक देत स्कॉर्पिओमध्ये कोंबून मारहाण करत खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यामध्ये बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेला यश मिळाले आहे. या टोळीतील पाच जणांना पकडण्यातही पोलिसांना यश मिळाले आहे.
मादळमोही येथील व्यावसायिक कैलास शिंगटे ( वय 33) यांना 27 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास साठेवाडी येथे मोटारसायकलने जात असताना पाठीमागून धडक देत त्याच्या डोळ्यामध्ये चटणी फेकण्यात आली. त्यानंतर तोंडात बोळे कोंबत हातपाय बांधून चारचाकीत कोंबत मारहाण करण्यात आली होती. हत्याराने हातपायावर जखमा करत ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे या टोळीने दहा लाख रूपयाच्या खंडणीची मागणी केली होती.
कैलास यांना मारहाण करत वडीगोद्रीजवळ गाडीतून बाहेर फेकून दिले होते. या प्रकरणाचे धागेदोरे शोधण्यात बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेला यश आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश वाघ यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या तपासाला सुरूवात केली आणि संतोष धनगर (रा.गोपाळवस्ती, बेलगाव, ता.गेवराई), ज्ञानेश्वर माळी (रा.गोपाळवस्ती, बेळगाव, ता.गेवराई), रामा गव्हाणे (गोपाळवस्ती, ता.गेवराई), संजय पवार (रा.सावरगाव, ता.गेवराई), विशाल जाधव (रा.म्हाळसपिंपळगाव, ता.नेवासा) यांनी एकत्र हा गुन्हा केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर या सर्वांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या टोळीचा पर्दाफाश झाल्याने स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक केले जात आहे.


























































