सावधान! मेंढराचे कातडे पांघरून भाजपात लांडगे घुसत आहेत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपात सध्या पक्षप्रवेशाचा धमाका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी पक्षाला सावधानेचा इशारा दिला असून मेंढराचे कातडे पांघरून भाजपात लांडगे घुसत आहेत, असे खळबळजनक विधान सिंह यांनी केले आहे.

महाराष्ट्र, हरयाणा आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोग कधीही जाहीर करू शकते. एकीकडे भाजपची त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असतानाच दुसरीकडे इतर पक्षांतील ‘आयारामां’चे प्रवेश सोहळे रंगले आहेत. इंद्रजीत सिंह यांनी यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली असून दुसऱया पक्षातून भाजपात येणारे कुणी साधूसंत नाहीत, तर मेंढराचे कातडे पांघरलेले हे लांडगे आहेत. मला जर पक्षाने अधिकार दिले तर यापैकी एकालाही मी निवडणुकीचे तिकीट देणार नाही, असे सिंह यांनी म्हटले आहे.

इंद्रजीत सिंह हे गुडगाव मतदारसंघातील भाजप खासदार असून त्यांनी हरयाणातील रेवाडा येथील जाहीर सभेत बोलताना पक्षातील ‘आयाराम’ संस्कृतीवर जोरदार प्रहार केला.

पवारांचे ‘निसटावंत’ उदयनराजे आज भाजपात
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकामागून एक पक्षाध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. साताऱयातील पवारांचे निष्ठावंत खासदार उदयनराजे भोसलेसुद्धा ‘निसटावंत’ झाले असून ते शनिवारी भाजपत प्रवेश करणार आहेत. त्यांनी स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली असून नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी भाजपने लोकसभा निवडणुकीपासून फिल्डिंग लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यासाठी गळ टाकला होता. अखेर गुरुवारी उदयनराजे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेत राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला. सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये जावे लागत आहे. तुमचे आशीर्वाद असूद्या असे म्हणत त्यांनी ट्किटरवरून पवारांचा निरोप घेतला. राजधानीत एका जंगी सोहळय़ात उदयनराजे यांचा भाजप प्रवेश होणार आहे.