
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या माजी मंत्र्यांच्या कॉलेजमधून एक तरुणी नग्न आणि जळालेल्या अवस्थेत आढळली होती. तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. बलात्काराचा प्रयत्न असफल झाल्याने नराधम आरोपींनी तिच्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले.
उत्तर प्रदेशच्या शहाजनपूरमध्ये एक तरुणी मंगळवारी सकाळी अकरा वाजता तरुणीच्या वडिलांनी तिला स्वामी सुखदेवानंद कॉलेजमध्ये लेक्चरसाठी सोडले. दुपारी तीन वाजता तिचे कॉलेज सुटणार होते, दुपारचे तीन वाजले तरी ही तरुणी कॉलेजमधून बाहेर पडली नाही. घाबरलेल्या वडिलांनी तिला तीन तास शोधले पण ती सापडली नाही. नंतर दिल्ली-लखनऊ महामार्गाजवळ ही तरुणी जळालेल्या अवस्थेत सापडली. या तरुणीच्या अंगावर एकही कपडा नव्हता, त्यामुळे तिच्यावर बलात्कार झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही असं पोलिसांनी म्हटले होते.
आता मुलीने आपल्यावर तीन जणांनी सामुहिक बलात्काराचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तरुणीने तिघांचा जोरदार प्रतिकार केला, बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने नराधमांनी तिच्यावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवले. या घटनेत तरुणी आधी 60 टक्के भाजल्याचे वृत्त होते, आता डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी 72 टक्के भाजली आहे.
सीसीटीव्हीत पीडित तरुणी कॉलेजमध्ये गेल्यानंतर आपल्या मित्र मैत्रीणींशी बोलताना दिसत आहे. 20 मिनिटानंतर ती कॉलेजबाहेर जाताना दिसत आहे. पीडित तरुणी आपला जबाब सारखा बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. कॉलेजमधून गेल्यावर आपण हॉस्पिटलमध्ये कसे आले हेही आपल्या माहित नसल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तिकडे काही काचेचे ग्लास आढळले पण कुठेही दारू आढळली नाही. पोलिसांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन टीम स्थापन केल्या आहेत. आतापर्यंत 12 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे. ज्या कॉलेजमध्ये तरुणी शिकत होती, ते कॉलेज भाजपचे माजी मंत्री स्वामी चिन्मयानंद यांचे आहे. त्यांच्यावर एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता.





























































