
सामना ऑनलाईन । बरेली
उन्नाव येथील बलात्कार प्रकरणात भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर याला दोन महिन्यांपूर्वी गजाआड गेल्याच्या पाठोपाठ भाजपच्या बरेली येथील आमदारावरही बलात्काराचा आरोप झाला आहे. या प्रकरणात पीडित तरुणीने वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली.
बिसौलीचे भाजप आमदार कुशागारा सागर यांनी २०१४ सालात आपण ‘अल्पवयीन’ असताना प्रेमाच्या आणाभाका खाऊन लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर बलात्कार केले असे त्या तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. आपली आई भाजप आमदाराकडे घरकामासाठी जायची. त्यावेळी मीही तिच्यासोबत बऱयाचदा जात असे. त्या काळात आमदार सागर याने प्रेमाच्या जाळय़ात ओढून ‘अल्पवयीन’ असताना आपल्यावर बलात्कार केले, असे त्या तरुणीने पोलीस अधीक्षकांना सांगितले.
त्याविरोधात आपण त्याचवेळी बारादारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पण त्यावेळी आमदार कुशागारा सागर याच्या वडिलांनी ‘तू सज्ञान झाल्यावर तुम्हा दोघांचे लग्न लावून देतो’ असे वचन देत कारवाई होऊ दिली नव्हती. भाजप आमदार कुशागारा सागर याने आता दुसऱया तरुणीशी लग्न निश्चित केले आहे, मात्र आपल्याला न्याय न मिळाल्यास आपण आत्महत्या करू असा इशारा त्या तरुणीने दिला आहे.

























































