
सामना प्रतिनिधी । पारनेर
पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील चार वर्षांच्या चिमुरडीवर शेजारीच राहत असलेल्या नराधमाने खेळण्यास बोलावून अत्याचार केल्याची घटना दिनांक २१ नोव्हेंबर रोजी घडली आहे. हा प्रकार गावातीलच काही प्रतिष्ठित नागरिकांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयन्त केल्याने तब्बल तीन दिवसानंतर चाईल्ड लाईनच्या माध्यमातून उघड झाला असून पारनेर पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली आहे.
या बाबत पोलीस सूत्रांकडून व चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथे मूळच्या जुन्नर तालुक्यातील व हल्ली राळेगण थेरपाळ येथे शेतमजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील चार वर्षांच्या मुलीवर शेजारीच राहणाऱ्या नारायण भाऊसाहेब खोसे रा. राळेगण थेरपाळ, वय २७ याने या मुलीला घरात खेळण्यासाठी बोलवून तिचे कपडे काढले व तिच्यावर निर्दयीपणे बलात्कार केला.
दरम्यान या बाबत गावात माहिती मिळाल्यानंतर गावातीलच काही प्रतिष्ठित नागरिकांनी ही घटना दाबली असल्याची चर्चा तीन दिवस होत होती. याबाबत चाइल्ड लाइन या संस्थेकडे तक्रार आल्याने या संस्थेच्या वतीने प्रवीण कदम व मीनाक्षी पवार या कार्यकर्त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती मिळवली व संस्थेच्या मदतीने मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलिसात फिर्याद आज २५ नोव्हेंबर रोजी दिली त्यामुळे ते या अमानुष घटनेचे प्रकरण दाबणारे प्रतिष्ठित कोण याबाबत तालुक्यात चर्चा होत आहे.
एक मुलगी बेपत्ता तर दुसरीवर अत्याचार
तीन दिवसात राळेगण थेरपाळ येथे १२ वर्षाची दिव्या कारखिले ही मुलगी बेपत्ता झाली असून तिचा अद्यापही शोध लागला नसतानाच याच गावातील चार वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याने राळेगण थेरपाळ गाव हादरले असून तालुक्यातही या घटनांचे पडसाद उमटत आहे. दरम्यान बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध न लागल्याने आज दिनांक २६ नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी रास्ता रोको व गाव बंदचा इशारा दिला आहे





























































