हिऱ्याच्या आतून निघाला 80 कोटी वर्षं जुना हिरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिरा हा दुर्मीळ घटकांपैकी एक मानला जातो. रशियातील मास्कोमध्ये हिऱ्याच्या आत लपलेला दुसरा हिरा सापडल्याची अतिदुर्मीळ प्रकारातली घटना घडली आहे.

या हिऱ्याचं वय तब्बल 80 कोटी वर्षं इतकं असल्याचं सांगण्यात येत आहे. मत्रयोश्का नावाच्या एका रशियन बाहुलीसारखा हा हिरा एका हिऱ्यातून निघाला आहे, म्हणून या हिऱ्याचं नावही मत्रयोश्का ठेवण्यात आलं आहे. मत्रयोश्का हा बाहुल्यांचा एक खेळ असून त्यात एकात एक अशा बाहुल्या दडवलेल्या असतात. हा हिरा देखील दुसऱ्या हिऱ्याच्या आत दडलेला आढळला आहे.

या हिऱ्याची निर्मिती नेमकी कशी झाली असावी, याचा संशोधक शोध घेत आहेत. कारण हा असा हिरा जगात सर्वप्रथम सापडला आहे. दोन्ही हिऱ्यांमध्ये फक्त हवा राहिल इतकीच जागा असल्याचा शोध लागला आहे. त्यामुळे आधी लहान हिरा तयार होऊन मग त्यावर नवीन हिरा तयार झाला असावा, असा त्यांचा अंदाज आहे.

0.02 कॅरेटच्या या हिऱ्याची संरचना जटील स्वरूपाची आहे. त्यामुळे हा हिरा नेमका किती किमतीचा आहे, त्याचा अंदाज अजून लावता आलेला नाही.