एम.एफ. हुसेन यांच्या 25 दुर्मिळ चित्रांचा लिलाव होणार, हायकोर्टाची परवानगी

दिवंगत चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या 25 दुर्मिळ चित्रांचा लिलाव होणार आहे. हायकोर्टाच्या परवानगीनंतर 12 जून रोजी हा लिलाव केला जाणार असून एम.एफ. हुसेन यांच्या अवर प्लॅनेट कॉल्ड अर्थ या मालिकेतील चित्रांचा यात समावेश आहे.

इंडस्ट्रियलिस्ट गुरू स्वरूप श्रीवास्तव यांच्या स्वरूप ग्रुपने 236 कोटींच्या थकीत कर्ज प्रकरणी नाफेडद्वारे सुरक्षित केलेल्या चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्या चित्रांचा लिलाव करण्याची परवानगी 17 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती रियाज छागला यांनी मुंबईच्या शेरीफला दिली होती. मे 2024 मध्ये कलातज्ञ दादीबा पुंडोले यांनी उच्च न्यायालयात चित्रांचा मूल्यांकन अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये त्यांनी या चित्रांची किंमत 25 कोटी रुपये सांगितली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबईच्या शेरीफने फेब्रुवारीमध्ये पुंडोले आर्ट गॅलरीद्वारे चित्रांसाठी लिलाव सूचना जारी केली. हा लिलाव 12 जून रोजी दक्षिण मुंबईतील हॅमिल्टन हाऊस येथे होणार आहे. लिलाव पूर्ण झाल्यानंतर शेरीफला 3 जुलैपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

150 कोटी रुपयांचा गैरव्यवहार

2006मध्ये सीबीआयने स्वरूप ग्रुप आणि श्रीवास्तव यांच्याविरुद्ध नाफेडकडून घेतलेल्या 236 कोटी रुपयांच्या कर्जापैकी 150 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू केली. डिसेंबर 2008 साली ट्रिब्युनलने नाफेडला हुसेन यांच्या चित्रांसह 100 कोटी रुपयांच्या मालमत्तेची सुरक्षितता करण्यास परवानगी दिली.