
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे बसस्थानक परिसरात दुर्मिळ मानला जाणारा पट्टेरी पोवळा जातीचा विषारी साप आढळला. या दुर्मिळ पोवळा सापाला कोयना डिस्कव्हरी अधिवासात सोडण्यात आले आहे.
कोयनानगर बसस्थानक परिसर वर्दळीच्या व मोक्याच्या ठिकाणी असून, या ठिकाणच्या रिक्षा थांब्याजवळ साप दिसल्याने एकच गोंधळ उडाला होता. तसेच, त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. डिस्कव्हर कोयना टीमचे वन्यजीवरक्षक निखिल मोहिते यांना ही गोष्ट समजली व त्यांनी त्वरित धाव घेतली. तेथे गेल्यानंतर तीन फूट लांबीचा दुर्मिळ पट्टेरी पोवळा साप होता. साप हा निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्यांनी त्याला तत्काळ पकडून वन विभाग अधिकाऱयांच्या देखरेखीखाली निसर्गात मुक्त केले.
यावेळी कोयना वन्यजीवचे वनपाल संदीप कुंभार, चांदोली वन्यजीवचे वनपाल संदीप झोपाळे, डिस्कवर कोयना टीमचे पक्षीअभ्यासक संग्राम कांबळे, वन्यजीवरक्षक निखिल मोहिते, पक्षी अभ्यासक व पोलीस पाटील सागर जाधव, महेश शेलार, नरेश शेलार, विकास माने हे उपस्थित होते.
दुर्मिळ मानल्या जाणाऱया पट्टेरी पोवळा सापास पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आल्याने वन विभागाच्या कामगिरीबाबत पर्यावरणप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच, सापाबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पश्चिम घाटात जास्त आर्द्रतेच्या ठिकाणी अधिवास
पट्टेरी पोवळा हा एक दुर्मिळ साप असून, तो पश्चिम घाटात जास्त आर्दता असणाऱया ठिकाणी आढळतो. कोयना परिसरात स्थानिक लोक याला रात साप या नावाने ओळखतात. हा साप याच्याहून लहान असणारे इतर साप खातो. याला धोका वाटल्यास शेपटी गोलाकार गुंडाळून शेपटीखालच्या लालसर भागाचे प्रदर्शन करून शत्रूला सावध करतो. याचा दंश झाल्यास त्या ठिकाणी जळजळ होऊन सूज येणे व श्वास घेण्यास अडचण होणे ही लक्षणे दिसून येतात. इतरत्र दुर्मिळ असला तरी कोयना परिसरातील काही मोजक्या ठिकाणी हा साप आढळतो.



























































