मुंबईतील पहिली दुर्मिळ शस्त्रक्रिया; मेंदूत रक्तस्राव झालेल्या महिलेला मिळाले जीवदान

मेंदूतील रक्तधमनीचा फुगा फुटल्याने मेंदूत रक्तस्राव झालेल्या 59 वर्षांच्या महिलेवर करण्यात आलेली अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयातील मेंदूविकार तज्ञांनी यशस्वी केली आहे. अशा प्रकारची ही देशातली अकरावी, तर मुंबईतली पहिली शस्त्रक्रिया आहे. कूपरचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रणा आणि औषधे उपलब्ध करून दिली.

मुंबई महापालिका अत्यंत माफक दरात आधुनिक आरोग्य-वैद्यकीय सेवा सुविधा पुरवते. याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या डॉ. रू. न. कूपर रुग्णालयात मज्जासंस्था विकार उपचार विभाग सुरू करण्यात आला आहे. जुहू-विलेपार्लेमधील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात डोकेदुखी व उलटय़ांचा त्रास सुरू असलेल्या महिलेला दाखल करण्यात आले. वैद्यकीय निदानानंतर महिलेच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याचे आढळले. दाट मऊ ऊतकांच्या वातावरणात रक्तवाहिन्या स्पष्टपणे दृश्यमान करण्यासाठी डिजिटल सब्स्ट्रक्शन अँजिओग्राफी (डीएसए) या फ्लुरोस्कोपी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. त्यात या महिलेच्या मेंदूतील रक्तधमनीचा फुगा फुटल्याने मेंदूत रक्तस्राव झाला होता. अन्युरिझम हा एक धमनीचा विकार आहे. ज्यामध्ये धमनीचे आवरण किंवा भिंत कमकुवत होते आणि धमनी फुटून रक्तस्राव होऊ शकतो.

डॉक्टरांच्या टीमने केली शस्त्रक्रिया 

अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चेतासंस्थेच्या रोगांवर उपचार करणारे तज्ञ (न्युरोलॉजिस्ट) डॉ. प्रद्युम्न ओक, डॉ. मनीष साळुंखे, डॉ. अबू ताहिर यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. भूलतज्ञ विभागप्रमुख डॉ. अनिता शेट्टी, औषधवैद्यक शास्त्र विभागप्रमुख  डॉ. नीलम रेडकर, सहाय्यक प्राध्यापक डॉ. दीप रावळ यांचे सहकार्य लाभले.