रश्मी शुक्ला अहवालाची कागदपत्रे 31 ऑगस्टपर्यंत सीबीआयला देणार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai bombay-highcourt

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयला राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल तसेच रश्मी शुक्ला यांच्या अहवालाची कागदपत्रे 31 ऑगस्टपर्यंत सीबीआयकडे दिली जातील, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

अनिल देशमुखांवरील खंडणीच्या कथित आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी 22 जुलै रोजी न्यायालयाने पोलिसांच्या बदल्या व अधिकाऱयांच्या नियुक्तीबाबत सीबीआयला तपास करण्याची परवानगी दिली होती. असे असताना राज्य सरकारने अद्याप त्यासंदर्भातील कागदपत्रे आपल्याला सुपूर्द केलेली नाहीत असा दावा करत सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ काैन्सिल रफिक दादा यांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, सीबीआयला आवश्यक ती कागदपत्रे देण्यास आम्ही तयार आहोत, पण या प्रकरणातील पंचनामा अहवाल सीबीआयला देता येणार नाही. कारण पोलिसांनी याप्रकरणी सुरू केलेल्या तपासाचा एक भाग असल्यामुळे तो आम्ही सुपूर्द करू शकत नाही. मात्र या प्रकरणातील घटनांचा क्रम पाहण्यासाठी पंचनामा आवश्यक असल्याचे सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर राज्य सरकारने विरोध करत अनिल देशमुख प्रकरणाशी याचा काहीही संबंध नसल्याचे रफिक दादा यांनी सांगितले. दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेत खंडपीठाने सुनावणी 2 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

अशी प्रकरणे न्यायालयासमोर नकोत

इतर गुह्यांसदर्भात अनेकवेळा राज्य सरकार आणि सीबीआय कागदपत्रे व माहिती एकमेकांना पुरवत असते. त्यामुळे राज्य सरकार व सीबीआयने अशी प्रकरणे न्यायालयासमोर आणण्याची गरज नाही. स्वातंत्र्यापासून आपल्या महाराष्ट्राची प्रतिष्ठा आणि विकास ही नेहमीच इतर राज्यांच्या तुलनेत एक पाऊल पुढे राहिली आहे. आम्हाला ती कायम ठेवणे गरजेचे आहे असे खंडपीठाने स्पष्ट केले.