
मणिपूरचे सर्जनशील नाटककार, दिग्दर्शक, लेखक व कवी रतन थिय्याम यांचे बुधवारी वयाच्या 77 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. इम्फाळ येथील प्रादेशिक वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने रंगभूमीवरील रत्न हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
रतन थिय्याम यांचा जन्म 20 जानेवारी 1948 रोजी मणिपूरमध्ये झाला. त्यांना लहानपणापासूनच कलाक्षेत्राची आवड होती. करणभरम, इम्फाळ इम्फाळ, चक्रव्यूह, लेंगशोनेई, उत्तर प्रियदर्शी, चिंगलोन मॅपन टम्पक अमा, ऋतुसंहारम, अंध युग, वाहूदोक, आशिबागी एशेई, लायरेम्बिगी एशेई, रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘राजा’ या नाटकावर आधारित ‘द किंग ऑफ डार्क चेंबर’ ही त्यांची नाटके लक्षवेधी ठरली.
थिय्याम यांनी 1976 साली इम्फाळस्थित ‘कोरस रेपर्टरी थिएटर’ नावाच्या नाटय़संस्थेची स्थापना केली होती. थिय्याम हे राष्ट्रीय नाटय़ विद्यालयातून पदवीधर झालेले मणिपूरमधील पहिले व्यक्ती होते. त्यांनी 1987 ते 1988 पर्यंत ‘एनएसडी’चे संचालक म्हणूनही काम पाहिले आणि त्यानंतर 2013 ते 2017 या काळात अध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली