गोरगरीबांच्या धान्याला पाय फुटले, दलालांच्या घरातून काळाबाजार; नेरेपाडा गावातून 42 गोणी हस्तगत

गोरगरीबांसाठी रेशनिंग दुकानातून वितरण होणाऱ्या धान्याला आता पाय फुटले आहेत. त्यामुळे हे धान्य गोरगरीबांच्या घरात जाण्याऐवजी दलालांच्या घरात जात आहे. हक्काच्या या धान्याचा काळाबाजार होत असल्याने गोरगरीबांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. तालुक्यातील नेरेपाडा येथील एका घरावर पुरवठा विभाग आणि तालुका पोलिसांनी छापा मारून चोरून विक्रीसाठी ठेवलेले 42 गोणी धान्य जप्त केले. प्रशासनाच्या या धडक करवाईमुळे रेशनिंगचे धान्य चोरून विकणारे दलाल आणि त्यांना सहकार्य करणारे कर्मचारी यांची पळापळ उडाली आहे.

नेरेपाडा गावात राहणारे चंद्रहास कडू यांच्याकडे अधिकृत परवाना नसताना ते राहत असलेल्या घरी अवैधरीत्या रेशनिंगचे धान्य साठवलेले आहे, अशी माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रकार पनवेल तहसीलदार व अप्पर तहसीलदार यांच्या कानावर घातला. त्यानुसार पनवेलचे पुरवठा निरीक्षक शिरीष शितोळे यांना प्रशासनाने कारवाईचे आदेश दिले. पुरवठा विभाग आणि पनवेल तालुका पोलिसांनी यांच्या घरावर छापा मारून रेशनिंगच्या धान्याच्या 42 गोणी जप्त केल्या.

गोण्यांवर शासनाचे स्टीकर्स
नेरेपाडा गावात सापडलेल्या धान्याच्या गोण्यांवर शासकीय पुरवठा विभागाचे स्टीकर्स आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या घरातून शासकीय धान्याचा हा काळाबाजार सुरू होता, असे नेरे येथील मंडळ अधिकारी एस. एस. पाटील यांनी यांनी केलेल्या चौकशीत आढळून आले आहे. परिसरात तांदळाची व गव्हाची विक्री करण्यासाठी आणलेला साठा या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पुरवठा विभाग आणि पनवेल तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.