
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लोकांची आर्थिक स्थिती बिकट झाली असून अन्नधान्य मिळण्याबाबत त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर, लोकांच्या तक्रारींचा निपटारा लवकर व्हावा आणि रेशनिंग व्यवस्था अधिक लोकाभिमुख करावी, अशी मागणी शिवसेनेने विधान परिषदेत केली.
राज्यात सर्वसामान्यांना रेशन नाकारणे, रेशन घेतल्यावर दुकानदारांकडून पावती देण्यात न येणे, निकृष्ट दर्जाचे धान्य वितरीत करणे, कोट्यापेक्षा कमी धान्य देणे, शिधावाटप दुकानात तक्रार करण्याबाबत माहिती फलक नसणे, शिधावाटप अधिकाऱ्यांकडून तक्रार अर्ज नाकारण्यात येणे, हमीपत्र भरलेले असतानाही उत्पन्न दाखला मागून त्रास देणे तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरपोच रेशन देण्याची तरतूद असतानाही त्याची अंमलबजावणी केली न जाणे इत्यादी प्रकारांमुळे रेशनिंग ग्राहक त्रस्त आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत असलेल्या तक्रारींचा निपटारा राज्य सरकारने तातडीने करावा आणि रेशनिंग व्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे राज्य सरकारकडे केली.



























































