
बॉलिवूडेच प्रसिद्ध अभिनेता नसिरुद्दीन शाह यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक यांच्या एका विधानाने वाद निर्माण झाला आहे. करवा चौथ ही भयानक प्रथा असून सुशिक्षित महिलाही तिचं पालन करतात, असं त्या म्हणाल्या आहेत.
रत्ना पाठक शाह यांनी एका जाहीर मुलाखतीत हे विधान केलं आहे. त्या म्हणाल्या की, कुणीतरी गेल्या वर्षी मला विचारलं होतं की मी करवा चौथचा उपवास ठेवणार आहे की नाही. आजच्या आधुनिक आणि सुशिक्षित महिला देखील हे व्रत ठेवतात हे भयानक नाही का? त्या हे व्रत आचरतात, नवऱ्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. हिंदुस्थानी संस्कृतीत वैधव्य ही एक भीषण परिस्थिती आहे, नाही का? म्हणजे याचा अर्थ हा की, असं काहीही करा ज्यामुळे तुम्ही वैधव्यापासून दूर राहू शकाल. खरंच? एकविसाव्या शतकातही आपण या गप्पा करतोय? सुशिक्षित महिला देखील असं करत आहेत. हिंदुस्थान एक अत्यंत सनातनी समाजात बदलताना दिसत आहे आणि आता आपल्याला सौदी अरेबियासारखं बनायचं आहे का?, असं विधान रत्ना पाठक शाह यांनी केलं आहे.
त्यांच्या या विधानावर वाद निर्माण झाला असून त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका केली जात आहे. काहींनी हिजाब परिधान करण्याशी करवाचौथची तुलना केली आहे. हिजाब घालणाऱ्या आधुनिक महिलांना त्यांच्या पसंतीचं स्वातंत्र्य आहे पण करवाचौथ करणाऱ्या आधुनिक महिला भयानक प्रथा पाळताहेत. कुठून येतो हा ढोंगीपणा? असं एका युजरने म्हटलं आहे.
तर एका युजरने म्हटलं आहे की, माझ्या श्रद्धेवर टीका करणारे लोक भयानक आहे. मी करवाचौथ व्रतपालन करते कारण मी एका स्वतंत्र देशात राहते, जिथे माझी ज्या गोष्टींवर श्रद्धा आहे, त्यांचं पालन मी करू शकते. मी एक आधुनिक महिला आहे कारण मी दुसऱ्यांचे निर्णय घेत नाही. मी एक बुद्धिमान महिला देखील आहे, कारण मला माझे अधिकार माहीत आहेत, असं या महिला युजरने म्हटलं आहे.
























































