
उशिरा आलेल्या मान्सूनने शनिवारी दमदार सलामी दिल्यानंतर रविवारी विश्रांती घेतली. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 728.60 मिमी पाऊस पडला.पहिल्या पावसात काही ठिकाणी नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दगड पडले होते. जयगड येथे घरावर वीज पडून एक महिला जखमी झाली आहे.
शनिवारपासून मान्सून सक्रीय होताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वच तालुक्यांत पावसाने दमदार सलामी दिली. मंडणगडमध्ये 112 मिमी. दापोलीत 103 मिमी, खेड 87.10 मिमी, गुहागर 47.10 मिमी, चिपळूण 62 मिमी, संगमेश्वर 55.90 मिमी, रत्नागिरी 86 मिमी, लांजा 113.40 मिमी आणि राजापुरात 60 मिमी पाऊस पडला.
मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात छोटे दगड रस्त्यावर आले होते. ते दगड उचलून बाजूला करण्यात आले. रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाट येथे गणेश मंदिरावर दरडीचा भाग कोसळला. रत्नागिरी तालुक्यात जयगड मौजे सत्कोंडी येथे घरावर वीज पडून दिप्ती काताळे जखमी झाल्या. त्यांच्या घराचेही नुकसान झाले आहे. गावडे आंबेरे येथे गोपीनाथ नाटेकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले. कोळंबे येथील सोनू पवार यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले आहे.



























































