
‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत राबवण्यात येत असलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेत रत्नागिरी जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाचा मान मिळवला आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याला हा प्रतिष्ठेचा ‘एक जिल्हा एक उत्पादन’ राष्ट्रीय पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. या यशामुळे रत्नागिरीने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
हिंदूस्थान सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागामार्फत ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजना देशातील प्रत्येक जिल्ह्यातून निवडलेल्या उत्पादनाच्या ब्रँडिंग आणि प्रोत्साहनासाठी राबवली जाते. या राष्ट्रीय पुरस्कारासाठी देशभरातील सर्व जिल्ह्यांनी नामांकन केले होते.
राष्ट्रीय स्तरावरील भौतिक पडताळणीमध्ये महाराष्ट्रातून नाशिक, अमरावती, नागपूर, अकोला, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, अहमदनगर, बीड, बुलढाणा, धुळे आणि गोंदिया या 14 जिल्ह्यांची निवड झाली होती. या संदर्भात, 26 डिसेंबर 2024 रोजी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सह व्यवस्थापक ताशी डोर्जे शेर्पा यांनी रत्नागिरी जिल्ह्याला विशेष भेट दिली होती. या भेटीदरम्यान, त्यांनी जिल्ह्याच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ असलेल्या हापूस आंब्याशी निगडीत उद्योगांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी सादरीकरण केले होते, ज्याची दखल केंद्र सरकारने घेतली.
आज भारत मंडपम, नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ‘राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2024’ कार्यक्रमात महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांना ‘राष्ट्रीय पुरस्कार 2024’ हिंदुस्थान सरकारकडून जाहीर झाले. यामध्ये महाराष्ट्र राज्याची सुवर्णगटामध्ये निवड झाली आहे. या 5 जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला असून, देशांमध्ये रत्नागिरी जिल्हा सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.