राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आज राज्यभरात धरणे आंदोलन केले. रत्नागिरी विभागात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दापोली, गुहागर, खेड आगारात कडकडीत बंद होता, तर अन्य आगारांत मात्र संमिश्र प्रतिसाद असल्याने 40 टक्के वाहतूकच बंद राहिली.संपामुळे प्रवासांचे हाल झाले.
राज्य परिवहन महामंडळाच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी ‘महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती’ स्थापन केली आहे. एसटीच्या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. राज्यभरात बैठकांचे सत्र थांबवून आंदोलन करण्याचा निर्धार कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आल्याने मंगळवारी (दि. 3) चालक-वाहक, यांत्रिक कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. गुहागर, खेड, दापोली आगारांतील कर्मचारी १०० टक्के संपात सहभागी झाल्याने तेथील एसटी फेऱ्या ठप्प झाल्या आहेत.