
सामना प्रतिनिधी। रत्नागिरी
रत्नागिरी जिह्यातील 2800 हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर मानवी साखळी उभारत भारत निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह तयार करून 23 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावा असे आवाहन विद्यार्थांनी केले.
शाळकरी मुले आणि मुलींनी मैदानावर शिस्तबद्धरीत्या आयोगाचा लोगो साकारला. हा सोहळा बघण्यासाठी शेकडो नागरिक स्टेडियमवर उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाचा लोगो तयार करून मतदानाचा संदेश देताना एक विक्रम घडवला आहे, असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे आदी या कार्यक्रमास उपस्थित होते. या उपक्रमात जी.जी.पी.एस, गो. दा. जांभेकर विद्यालय, ए. के. देसाई हायस्कूल, मिस्त्रा हायस्कूल, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, रत्नागिरी, डी. एन. कॉलेज, सेंट थॉमस विद्यालय आदींचे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते.




























































