
सामना प्रतिनिधी, मुंबई
देशातील दोन क्रमांकाचे नामांकन असलेल्या रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय हे कोकण कृषी विद्यापीठाशीच संलग्न ठेवण्याच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर कोकणात मोठे जनआंदोलन पुकारण्यात येणार आहे. समुद्रकिनारा नसलेल्या नागपूरच्या मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी कोकणातील मत्स्य विद्यापीठ संलग्न करण्यास शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. जून महिन्यात होणाऱया विधानसभेच्या अधिवेशनातही या विषयावर जोरदार चर्चा होण्याची चिन्हे आहेत.
कोकणातला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि मासेमारी व्यवसाय व त्यामुळे निर्माण होणारा रोजगार या पार्श्वभूमीवर मत्स्य विषयातील शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनासाठी 1981 मध्ये रत्नागिरीतील शिरगावमध्ये मत्स्य महाविद्यालय स्थापन करण्यात आले. मागील 38 वर्षांपासून हे महाविद्यालय दापोलीतील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे. पण आता हे मत्स्य महाविद्यालय नागपूरमध्ये सुरू केलेल्या महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत, पण कोकणातील लोकप्रतिनिधींनी व कोकणवासीयांनी कोकणातील हे महाविद्यालय नागपूरमधील विद्यापीठाशी संलग्न करण्यास विरोध केला आहे.
कोकणाशी संलग्नता कायम हवी
मुळात कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा महाविद्यालयातील अभ्यास व संशोधनासाठी भौगोलिकदृष्टय़ा अतिशय योग्य आहे. खारे निमखारे व गोडय़ा पाण्याचे स्रोत कोकणात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे. अनेक प्रकारच्या मत्स्य संशोधनाची कामे महाविद्यालयाच्या माध्यमातून मच्छीमारांपर्यंत पोहोचवणे शक्य आहे. विदर्भात समुद्र-गोडय़ा पाण्याचे स्रोतही नाही मग मत्स्य संशोधन नागपूरमध्ये कसे होणार, असा प्रश्न या मत्स्य महाविद्यालयातील मत्स्यशास्त्र पदवीधर संघाचे जनसंपर्क अधिकारी बहर महाकाय यांनी उपस्थित केला.
विरोध का?
कोकणातील या मत्स्य महाविद्यालयाला केंद्राच्या भारतीय अनुसंधान परिषदेकडून सातत्याने मानांकन मिळाले असून संशोधनाच्या कामासाठी व शिक्षण विस्तारासाठी केंद्राकडून निधी मिळतो, पण हे मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या विद्यापीठाशी संलग्न झाले तर कोकणातील या मत्स्य महाविद्यालयाला मिळत असलेला निधी इतर महाविद्यालयांमध्ये विभागला जाईल आणि निधीचे योग्य प्रकारे वितरण होणार नाही. परिणामी संशोधन व शिक्षणाच्या कामावर परिणाम होईल. त्यामुळे महाविद्यालयाची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती आहे.
शिवसेनेचा भक्कम पाठिंबा
रत्नागिरीतल्या शिरगावमधील मत्स्य महाविद्यालयाची संलग्नता दापोलीच्या कृषी विद्यापीठाशी कायम ठेवण्याच्या मागणीला शिवसेनेने भक्कम पाठिंबा दिला आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम, आमदार राजन साळवी, उदय सामंत, हुस्नबानू खलिफे तसेच सर्वच पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिला आहे.
तोडगा कधी काढणार?
2018 मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात कोकणातील हे मत्स्य विद्यापीठ नागपूरच्या महाराष्ट्र पशु मत्स्य विद्यापीठाशी संलग्न करण्याचा प्रस्ताव सादर झाला होता. पण कोकणातील सर्वच लोकप्रतिनिधींनी विरोध केला त्यामुळे यावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, पण अजून तोडगा निघालेला नाही असे महाविद्यालयातील कर्मचारी सांगतात.

























































