रत्नागिरीत वादळी पाऊस; जगबुडी, काजळी नद्यांनी धोका पातळी ओलांडली

641

वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सोमवारी रात्रभर पावसाचा कहर सुरु होता त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून परिसर जलमय झाला आहे. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई येथील काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने परिसर जलमय झाला आहे.

सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने झोडपायला सुरुवात केली. मध्यरात्रीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर वाढला.सकाळीही ढगाळ वातावरणासह कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी दहाच्या सुमारास जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड शहरवासियांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 92.71 मिमी पाऊस पडला. त्यामध्ये दापोली, लांजा, राजापूर वगळता इतर सर्वत्र अतिवृष्टी झाली आहे. संगमेश्वरमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून  तेथे  143.30 मिमी पाऊस पडला आहे.  तसंच,  गुहागर 110 मिमी, मंडणगड 102 मिमी, रत्नागिरी 100 मिमी, खेड 98 मिमी आणि चिपळूणमध्ये 83 मिमी पावसाची नोंद झाली.

आपली प्रतिक्रिया द्या