
रत्नागिरीतील नांदिवडे येथील गॅस टर्मिनलला परवानगी नसल्याचे सांगून मेरीटाईम बोर्डाने जिंदाल कंपनीच्या गॅस टर्मिनलचे काम थांबवले होते. पण त्यानंतर जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा गॅस टर्मिनलचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. शासनाचा आदेश मोडून गॅस टर्मिनलचे सुरू केलेले काम ग्रामस्थांनी आज बंद पाडले. कंपनीच्या या दादागिरी विरोधात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
प्रशासनाच्या आदेशाला वाटण्याच्या अक्षता लावणाऱ्या जिंदाल कंपनीवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने गॅस टर्मिनसचे काम तात्काळ थांबवले आहे. तरी देखील आज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम सुरू करण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक लोकांचा विरोध असताना देखील शासनाच्या कोणत्याही विभागाची परवानगी न घेता जिंदाल कंपनी मनमानी करून नांदिवडे गावातील लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. आधीच जिंदाल कंपनीच्या कोळशाची धूळ आणि राख याचा स्थानिकांना खूप त्रास होत आहे. आज नांदिवडे आणि जयगड परिसरामध्ये त्वचेचे आजार असलेले रुग्ण, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात होत आहेत. एवढा त्रास होत असताना देखील कंपनी गावामध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे, असा संताप माजी सरपंच गुरू सुर्वे यांनी व्यक्त केला. शासनाने या सर्व गोष्टींची दखल घेत लवकरात लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतरी करावे. आणि जिंदाल कंपनीवर कारवाई करावी, अशी शेतकरी आणि मच्छीमारांची मागणी आहे.




























































