
हवामान खात्याने 11 आणि 12 जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे़. त्या इशाऱ्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर शहरामध्ये आणि काही ग्रामीण भागामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
तसेच दरडप्रवण क्षेत्रामध्ये दरडी कोसळण्याचा धोका असल्यामुळे 11 आणि 12 जून रोजी संभाव्य पूरस्थिती निर्माण होणारी गावे आणि दरडग्रस्त ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज एका आदेशाद्वारे जाहीर केले आहे.
हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे आपत्तीव्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे. पूरपरिस्थिती निर्माण होऊन आणि दरडी कोसळून जिवीतहानी आणि वित्तहानी होऊ नये याकरीता प्रशासन उपाययोजना करत आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत नागरीकांनी घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
तसेच सर्व तहसीलदारांना पूरप्रवण क्षेत्र आणि दरड प्रवण क्षेत्रात जाहीर केलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत़. पूरप्रवण क्षेत्र आणि दरड प्रवण क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांचे स्थलांतरण करणे, मदत, बचाव व पुनर्वसन या कार्यासाठी प्रवास व उपाययोजना करण्यास परवानगी राहील असे जिल्हाधिकार्यांनी जाहीर केले आहे.

























































