नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या तीन राज्यांतून अनधिकृत प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि इतर राज्यात जाण्यास बंदी आहे. प्रवास करायचा असल्यास ई-पास आवश्यक आहे. मात्र, कोकण रेल्वेच्या नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या (एनआरएमयू) या मान्यताप्राप्त संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अनधिकृतपणे प्रवास केला. त्यांनी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयात काही अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. त्यानंतरही चार दिवस एक पदाधिकारी रत्नागिरीत राहत होता. मात्र, आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनापासून ही माहिती लपवून ठेवण्यात आली.

काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वेचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यावेळी तातडीने पाऊल उचलत त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 52 लोकांना कोरेंटाईन करण्यात आले होते. मात्र, एनआरएमयूच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती लपवल्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. कारवार येथून तीन राज्यांतून प्रवास करत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे (एनआरएमयू) कार्याध्यक्ष कृष्णनकुमार लक्ष्मण शेट रत्नागिरी कार्यालयात आले होते. त्यांनी रत्नागिरीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली तसेच सिंधुदुर्गातून आलेले दोन पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. या तिघांबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि या तिघांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला याची माहिती दिली नाही तसेच ई पास नसतानाही या पदाधिकाऱ्यांनी प्रवास कसा केला, असा असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जावी, अशी मागणी आता होत आहे.

कारवारमध्ये कृष्णनकुमार ताब्यात

कृष्णनकुमार लक्ष्मण शेट हे रत्नागिरीतून चार दिवसानंतर पुन्हा कारवारकडे प्रवास केला. यावेळी त्यांची तेथील रेल्वे स्थानकावर रत्नागिरीतून आल्याच्या प्रवासाची नोंद केली नाही. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली नाही. ते गुरुवारी कारवारला पोहोचले. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर त्यांना तेथील प्रशासनाने ताब्यात घेतले आणि घराजवळील हॉटेलमध्ये कोरेंनटाईन केले. तोपर्यंत ते घरीच होते.