
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना संगमेश्वर ते बावनदी दरम्यान अचानक महामार्ग बंद करून डायव्हर्जन तयार केले जात असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ता बंद केला जात असल्यामुळे सतत अपघात घडत असून वाहनांचे मोठे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहनचालकांकडून केल्या जात आहेत.
महामार्गाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी अचानक रस्ता बंद करून पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) दिले जात आहेत. मात्र त्या ठिकाणी सूचना फलक, प्रकाशयोजना किंवा सुरक्षेची उपाययोजना नसल्यामुळे चालकांना अचानक वळण घ्यावे लागत आहे. त्यामुळे वाहनांचा ताबा सुटून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत.
विशेषतः संगमेश्वर परिसरात सर्वाधिक डायव्हर्जन करण्यात आले असून त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. मोठ्या वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी चालकांना अचानक बदललेल्या मार्गामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने लक्ष देऊन योग्य सूचना फलक, प्रकाशयोजना व सुरक्षेची उपाययोजना करूनच चौपदरीकरणाची कामे करावीत, अशी मागणी केली आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने डायव्हर्जन देण्याची गरज व्यक्त होत आहे.


























































