
मराठी अभिनेते व विनोदी कलाकार प्रभाकर मोरे गणपती दर्शनासाठी आपल्या गावी आले असून, मुंबई-गोवा महामार्गाच्या खडतर प्रवासाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आपल्या बाप्पाला थेट गाऱ्हाणे घातले आहे. “या महामार्गाचे काम लवकर पूर्ण व्हावे आणि राजकीय लोकांना सद्बुद्धी दे बाप्पा,” असे आवाहन करत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
प्रभाकर मोरे यांचे मूळ गाव चिपळूण तालुक्यातील वहाळ असून, मोरेवाडीत त्यांचे घर आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ते गणेशोत्सवासाठी गावी आले. मात्र मुंबईहून चिपळूणकडे येताना महामार्गावरील खड्डे, रखडलेली कामे आणि प्रवाशांना सहन करावी लागणारी त्रासदायक अवस्था पाहून ते संतापले.नमहामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल 14-15 वर्षे उलटली आहेत. तरीदेखील अद्याप या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. कोकणवासीयांना प्रत्येक सणासुदीच्या काळात या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. या स्थितीवर व्यंगात्मक पद्धतीने टीका करत मोरे म्हणाले, “गणपती बाप्पा, आम्हाला सुख-समाधान दे. पण या महामार्गाच्या कामाला गती मिळावी, हीच खरी आमची इच्छा आहे. राजकारण्यांना सद्बुद्धी दे, जेणेकरून कोकणातील जनतेला या यातना सहन कराव्या लागू नयेत.” मोरे यांच्या या गाऱ्हाण्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.