
राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरला 6 आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर झाला आहे. वैद्यकीय कारणासाठी आंबेरकर याने जामीनासाठी रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याला सशर्थ जामीन मंजूर केला आहे. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला.
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारिशे याची थार गाडीखाली चिरडून हत्या केल्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 नुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर 7 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली होती. आंबेरकर याने न्यायालयात एकूण तीन वेळा जामीन अर्ज दाखल केले असून ते सर्व अर्ज फेटाळण्यात आले होते. वैद्यकीय कारणास्तव आंबेरकर याच्याकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
तपास अधिकाऱ्यांनी जामीन अर्जाला विरोध केला. अर्जदाराचा गुन्हेगारी इतिहास, राजकीय पार्श्वभूमी पाहता तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा त्यांना प्रलोभन देऊ शकतो. तसेच तो पळून जाण्याची शक्यता असल्याने जामीन अर्ज फेटाळून लावावा, अशी विनंती तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले की, आंबेरकर याच्याविरुद्ध आरोप गंभीर स्वरुपाचा आहे. अर्जदाराची राजकीय पार्श्वभूमी आहे आणि खटला अर्धवट सुरू आहे. आरोपी देखील माणूस आहे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. वैद्यकीय कारणांवरून गंभीर गुह्यातही जामीन देण्यात आल्याचे न्यायनिवाडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे कठोर अटी घालून आरोपीस सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन देणे योग्य ठरेल, असे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले.































































