
मतचोरी आणि बोगस मतदानाच्या आरोपामुळे निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका शिंदेगटाला बसला आहे. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी शिंदे गटाच्या इच्छुक असलेल्या उमेदवाराचेच नाव मतदारयादीतून वगळले गेले आहे.
२०२१ मध्ये रत्नागिरी नगर परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर गेली चार वर्ष अनेक इच्छुक उमेदवार निवडणूकीची तयारी करत होते. अखेर ऑक्टोबर महिन्यात नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. आरक्षण जाहीर होताच सर्व इच्छुक उमेदवार तयारीला लागले. त्याच दरम्यान मतदार पारूप यादी जाहीर झाली.
निवडणूक आयोगाच्या कारभाराचा फटका शिंदे गटाच्या रत्नागिरी शहर संघटक पुजा दीपक पवार यांना बसला.त्यांचे मतदार यादीतील नाव गायब झाले आहे. पूजा पवार रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र.५ आणि क्र.६ मधून इच्छुक उमेदवार होत्या. गेली चार-पाच वर्ष पूजा पवार या दोन्ही प्रभागात कार्यरत होत्या. नगर परिषद निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली होती मात्र निवडणूक आयोगाच्या कारभाराने त्यांची उमेदवारी अडचणीत आणली आहे.
निवडणूक आयोगाच्या कारभारात सध्या अनेक शंकाकुशंका घेतल्या जात आहेत. रत्नागिरी शहरात दुबार मतदार नोंद, वास्तव्य एका प्रभागात आणि मतदाराचे नाव दुसऱ्या प्रभागात असेही प्रकार पुढे येत आहेत. ग्रामीण भागातील काही मतदारांची नावे शहरात आली असल्याचाही आरोप होत असल्याने राजकीय पक्षांना अतिशय जागरूकपणे निवडणूक लढवावी लागणार आहे.