Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या

राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला पहिल्या लेखापरिक्षणात ‘ड’ वर्ग मिळाला होता. तसेच रत्नागिरी शाखेत अनेकांनी आपण कर्ज घेतलेले नसताना नोटीसा आल्याचा आरोप केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. याचा फटका राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेची मुख्य शाखा असलेल्या राजापूरला बसला. राजापूर शाखेतून सुमारे 100 कोटी रूपये पर्यंतच्या ठेवी काढून घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेने यंदाच्या आर्थिक वर्षातील लेखापरिक्षणात मे.संजय मालपाणी अ‍ॅण्ड असोसिएटस यांनी बॅंकेला ‘ड’ वर्ग दिला. 104 वर्षांचा इतिहास असणारी ही बॅंक ‘ड’ वर्गात गेल्याने खळबळ उडाली. बॅंकेत ठेवी असलेल्या संस्थाना धक्का बसला. त्यापाठोपाठ रत्नागिरी शाखेत गोंधळ उडाला. कर्ज न घेता आम्हाला नोटीसा आल्याचा आरोप अनेकांनी केला. काही मंडळींनी आम्ही जामीन नसताना आम्हाला जामीन असल्याच्या नोटीसा आल्या. सहाय्यक निबंधकांसमोरील सुनावणी दरम्यान गदारोळ झाला होता.

दरम्यानच्या काळात कर्ज प्रकरणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेऊन रत्नागिरी शाखेच्या व्यवस्थापकाला बॅंकने काढून टाकले. यासर्व घटनांचा परिणाम होऊन राजापूर शाखेतील सुमारे 100 कोटी रुपयांच्या ठेवी सभासदांनी भीतीपोटी काढून घेतल्याची माहिती पुढे येत आहे. राजापूर अर्बन बँकने ड वर्गाबाबत दाद मागितल्यानंतर सहकार आयुक्त व सहकार निबंधक पुण्याच्या दीपक तावरे यांनी राजापूर बॅंकेला ब वर्ग दिला आहे.