
कोकणातील शेतकरी वायंगणी शेतीत गुंतला असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत असून यामध्ये पावटा, हरभरा, मूग पिकांची लागवड जास्त प्रमाणात करण्यात येत आहे. भातकापणी बरोबरच काही ठिकाणी वायंगणी शेती केली जात असल्याचे चित्र संगमेश्वर खाडीभाग व परचुरी परिसरात दिसत आहे. भातशेती कापणीची कामे 25 टक्केच पूर्ण झाली असताना दुसऱ्या टप्प्यात शेतकरी वायंगणी शेतीमध्ये वळला आहे. भातशेतीपेक्षा फायदेशीर शेती म्हणून कोकणातील शेतकरी वायंगणी शेतीला महत्त्व देतो.
भातशेतीपेक्षा वायंगणी शेती ही जास्त प्रमाणात केली जाते. शास्त्री, सोनवी, बावनदी, असावी नदीच्या किनाऱ्यावर गोड्या पाण्यावर ही शेती केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वायंगणी शेतीला प्रारंभ होतो. यावर्षी मुसळधार पावसाने भातशेतीची कापणीची कामे लांबणीवर पडली आहेत. मात्र, सकाळच्या दरम्यान भातकापणी आणि लगेचच झोडणीचे काम केले जात आहे.
भात कापणीबरोबर शेतात जावून शेतकरी वायंगणी शेतीचे काम करीत आहे. ओझरखोल, परचुरी आदी भागात ही शेती सुरू झाली आहे. शेतकरी वायंगणी शेतीतच गुंतला असल्याचे दिसत आहे. परचुरी, बावनदी, वांद्री तसेच डिंगणी खाडीपट्ट्यात वायंगणी शेती प्रामुख्याने केली जाते. यामध्ये पावटा, हरभरा, मूग, कुळीथ यासारखे पिके घेतली जातात. याच्या जोडीला मुळा, पावटा, भाजीही घेतली जाते. ग्रामीण भागात होणाऱ्या वायंगणी शेतीमधील भाजी व पिके जवळच्या बाजारपेठेत विक्रीसाठी आणली जाते. त्यातून अनेकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे भातशेती बरोबर वायंगणी शेतीला तेवढेच महत्त्व आहे.
भातशेतीमधील तण काढून त्या जमिनीची मशागत केली जाते. त्यानंतर त्या जमिनीमध्ये पावटा, हरभरा, कुळीथ पीक घेतले जाते. कोकणात अनेक भागात ही शेती दिसत असून बचत गटाच्या माध्यमातूनही शेतीचे मळे फुलू लागले आहेत तर, काही ठिकाणी फुलांचीही लागवड केली जात आहे.