Ratnagiri News – पाय मारला अन् डांबर निघालं; गुडघे गावाच्या हद्दीत सुरू असलेलं रस्त्याचे काम निकृष्ट, ग्रामस्थ आक्रमक

दापोली तालुक्यात गुडघे गावाच्या सरहद्दीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेले रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्यावर पसरलेल्या डांबराला पाय मारला असता डांबर मिश्रीत खडी उकरली गेली. त्यामुळे येथील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम उप विभाग दापोली यांच्या देखरेखीखाली दापोली तालुक्यातील गुडघे गावातून जाणाऱ्या एका रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सोमवारी 28 एप्रिलपासून सुरू करण्यात आले आहे. हे रस्ता डांबरीकरणाचे काम “महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या सन 2019” च्या अर्थसंकल्प अधिवेशनात मंजूर करण्यात आले होते. सुमारे 13 कि.मी. अंतर लांबीच्या आणि 3 कोटी 25 लाख अंदाजपत्रकीय रक्कमेच्या महाड, दापोली, उंबरघर नावाच्या शीर्षकाखाली मंजूर कामाची निविदा प्रक्रिया सन 2022 मध्ये पूर्ण झाली. त्यानुसार रस्ता डांबरीकरण सुरू झाले. यातील साधारणपणे 7 कि.मी. लांबीच्या अंतराचे काम आधीच पूर्ण झाले असून शिल्लक राहिलेले उर्वरित डांबरीकरणाचे काम हे सोमवार 28 एप्रिल 2025 पासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकही जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी उपस्थित नसतानाही एकाच रात्रीत सुमारे 2 कि. मी. लांबी अंतराच्या डांबरीकरणाचे काम मक्तेदाराने पूर्ण केले. सकाळी उजाडल्यावर येथील ग्रामस्थांनी पाहीले तर रस्ता पूर्णतः निकृष्ट दर्जाचा झालेला दिसला.

रस्ता डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब मंदार दांडेकर यांनी मंगळवारी 29 एप्रिल 2025 रोजी सकाळीच सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता निनाद दामले यांना सांगितली. त्यानुसार दुपारी सार्वजनिक बांधकाम विभाग दापोली येथील कार्यरत काही माणसे गुडघे येथे रस्ता पाहणीसाठी आली, त्यावेळी येथे आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधी तसेच मक्तेदाराच्या माणसांना खडे बोल सुनावले.