
आठ दिवस पावसाने पाठ फिरवली आणि तेवढीच संधी साधून शेतकऱ्यांनी कापणीच्या कामाला जोमाने सुरूवात केली. या सात आठ दिवसातल्या रखरखत्या उन्हात शेतकरी राबताना दिसत होते. अंगातून घामाच्या धारा वहात होत्या पण चेहऱ्यावर समाधानाचं स्मीत होते. दहा ते बारा तास शेतात मेहनत करणारे शेतकरी आपल्या मेहनतीचे पिवळे सोने पाहून हरखून गेले होते. पण अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी हताश झाला आहे.
कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी गडगडाटासह वादळीवाऱ्यासह पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या हवामान खात्याच्या अंदाजाला दुर्लक्ष करणाऱ्या तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना आज (15 ऑक्टोबर 2025) पावसाने पाणी दाखवले. सकाळपासून निरभ्र आकाश असल्याचे शेतीची कामे जोमाने सुरू झाली. पावसाची शक्यता फेटाळून रोजच्या जोशात कामे सुरू झाली. दुपारी साडेबारा वाजता आकाश काळवंडून आले. बघता बघता डोक्यावर काळे ढग दाटलेले पाहून शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. सर्वत्र भाताची कापणी करून ते सुटण्यासाठी पसरवले होते. काहीजण शेतात मळणी काढीत होते. काही भाताचा पेंढा सुकविण्यासाठी झटत होते. या सर्वांची पावसाने भंबेरी उडवली. वादळीवाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी केले. आता शेतकऱ्यांचे श्रम अधिक वाढणार. या वादळीवाऱ्यात उभे भाताचे पीक जमीनदोस्त झाले. आणि जर हा पाऊस पुढील काही काळ सुरू राहीला तर फार मोठे नुकसान होणार आहे.