
दापोली तालुक्यातील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत त्यांच्याकडून तब्बल 1 कोटी 23 लाख उकळण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी 3 संशयितांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथून विस्तार शिक्षण संचालक पदावरून नुकतेच निवृत्त झालेल्या डॉ. मकरंद जोशी यांना संशयित आकाश शर्मा, शिवप्रकाश व दया नायक यांनी 4 नोव्हेंबर ते 19 जानेवारी या काळात आपण बेंगलोर पोलीस व नवी दिल्ली येथील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. जोशी यांच्या नावे कॅनरा बँक शाखा माटुंगा (मुंबई) येथे खाते असून त्यात 3 कोटी रुपयांचा फ्रॉड झाला असल्याची बतावनी केली आणि त्यांना 50 लाख रुपये दंड भरावा लागेल असं सांगत डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवण्यात आली. त्यानंतर जोशी यांना ऍक्सीस बँक तुळजापूर, आयडीएफसी बँक मुंबई व आयसीआयसिआय बँक शाखा वाशी, नवी मुंबई या बँकेमधील खात्यात एकूण 1 कोटी 23 लाख रुपये भरायला लावले. या सर्व प्रकारामुळे दापोली तालुक्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. मकरंद जोशी यांनी याप्रकरणी 3 जणांविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना सुत्र हलवली आणि संशयित आकाश शर्मा, शिवप्रकाश, दया नायक यांचेविरोधात भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करत आहेत.
























































