Ratnagiri News – बांधकाम कारागीराने रस्त्यात सापडलेली तीन लाख रुपयांची रक्कम प्रामाणिकपणे केली परत, संगमेश्वर बुरंबी मार्गावरील घटना

बांधकाम कारागीर असणारे संगमेश्वर तालुक्यातील शिवने होरंबे वाडी येथील सुनील गणपत होरंबे यांना संगमेश्वर बुरंबी मार्गावर रस्त्यात सापडलेली तीन लाख रुपयांची रोख रक्कम शोध घेऊन संबंधित मालकाला अत्यंत प्रामाणिकपणे परत केली. होरंबे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे शिवने गावासह परिसरातून अभिनंदन केले जात आहे.

प्रामाणिकपणाची उदाहरणे आजकाल खूपच कमी पाहायला आणि ऐकायला मिळतात. मात्र समाजात प्रामाणिकपणा काही प्रमाणात का होईना अजूनही शिल्लक असल्यानेच काही चांगली उदाहरणेही ऐकायला मिळतात. असाच एक प्रकार नुकताच संगमेश्वर बुरंबी मार्गावर मयूरबाग थांब्याच्या काही अंतर पुढे अनुभवायला मिळाला. शिवने होरंबेवाडी येथे राहणारे सुनील होरंबे हे काही कामानिमित्त सकाळच्या वेळी बुरंबी येथे गेले होते. बुरंबी येथून शिवने येथे परत येत असताना त्यांच्यापुढे एक दुचाकी स्वार होता. त्याच्या दुचाकीवरून एक प्लास्टिकची पिशवी रस्त्यात पडली. या पिशवीतून काही नोटा रस्त्यावर विखुरल्या. पाठोपाठ येणाऱ्या सुनील होरंबे यांनी आपली दुचाकी थांबवून या सर्व नोटा पिशवीत भरल्या आणि त्या दुचाकी स्वाराचा पाठलाग सुरू केला. मात्र संगमेश्वर पर्यंत हा दुचाकीस्वार न सापडल्याने अखेर होरंबे यांनी पिशवीत काही अन्य कागद सापडतात का, ते पाहिले असता त्यात सदर पैसे ज्या कार्यालयात भरायचे होते त्याची सरकारी स्लिप सापडली. कार्यालयाचा पत्ता असल्याने होरंबे यांनी शोध घेण्यास सुरुवात केली.

तोपर्यंत कार्यालयात भरायची रक्कम आपल्या हातून गहाळ झाल्याचे लक्षात येताच आणि ती शोधूनही न सापडल्याने हवालदील झालेल्या केंद्र सरकारी कार्यालयाशी संबंधित इसमाने सदर रक्कम कर्ज काढून भरण्यासाठी एका पतपेढीकडे जाण्याचे ठरवले. सुनील होरंबे यांनी सदर कार्यालयाशी संबंधित अन्य इसमाला फोन करून तीन लाख रुपयांची रक्कम सापडल्याचे सांगितले. होरंबे यांनी फोन केलेल्या इसमाने ही रक्कम असणाऱ्या संबंधित कार्यालयातील कर्मचाऱ्याला कळवले. त्यावेळी त्याने आपण कर्ज काढण्यासाठीच चाललो होतो, असे सांगून रक्कम मिळाल्याचे ऐकून सुटकेचा श्वास टाकला.

केंद्र सरकारशी संबंधित कार्यालयातील सदर कर्मचारी सुनील होरंबे यांना भेटण्यासाठी परत आला आणि होरंबे यांनी सर्व प्रकारची खातरी करून सदर तीन लाख रुपयांची रक्कम संबंधितांच्या ताब्यात दिली. या तरुणासह त्याच्या वडिलांनी सुनील होरंबे यांना काही रक्कम बक्षीस म्हणून देऊ केली मात्र होरंबे यांनी असे बक्षीस घेणे देखील नम्रपणे नाकारले. तीन लाख रुपये परत मिळताच केंद्र सरकारशी संबंधित कार्यालयातील सदर तरुणाच्या डोळ्यात अश्रू आले. सुनील होरंबे यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल शिवने ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र उर्फ नाना हळबे तसेच शिवने गावासह परिसरातून सुनील होरंबे यांचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.