
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथील गाणे राजवाडा परिसरात शुक्रवारी सकाळी दोन अल्पवयीन बहिणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळताच शिरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र विषबाधेचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहेत.
दोघी अल्पवयीन बहिणी सकाळी साडेदहाच्या सुमारास घरामागील जंगलात शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्या घरी परतल्या व गोठ्यात शेळ्या बांधल्या. काही वेळाने त्यांच्या मोठ्या बहिणीने घरात पाहणी केली असता त्या दोघी कुठेही दिसल्या नाहीत. शोधाशोध केल्यावर त्या गोठ्याजवळ तळमळत आणि घोरत असल्याचे दिसले. बहिणीने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली. तत्काळ त्यांना घरात आणण्यात आले, मात्र तोपर्यंत दोघींचा मृत्यू झाला होता. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील करत आहेत.