
ध्वनीक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनीप्रुषणाबाबत मार्गदर्शक सूचना रत्नागिरी पोलिसांनी जाहिर केल्या आहेत.यापुढे परवानाधारकांनाच ध्वनिक्षेपक वापरण्याची मुभा रहाणार आहे.नियमांचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांना पहिल्यावेळी समज दिला जाणार आहे मात्र त्याची पुनरावृत्ती झाल्यास 1 लाख रुपयांचा दंड व पाच वर्षांचा कारावास भोगावा लागू शकतो.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पोलीस महासंचालक मुंबई यांच्या स्थायी आदेशानुसार ध्वनीप्रदुषणाबाबत सखोल मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. विनापरवाना,अनधिकृत आणि अधिक आवाज करणारे ध्वनीक्षेपक यांचा पंचनामा करण्यात येणार आहे.ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यास पोलीस ध्वनीमापक यंत्राचा वापर करून आवाजाची मोजणी करणार आहेत.विविध परिसरात ध्वनीक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.त्यामध्ये औद्योगिक क्षेत्र दिवसा 75 डेसिबल आणि रात्री 70 डेसिबल,व्यवसायिक क्षेत्र दिवसा 65 डेसिबल आणि रात्री 55 डेसिबल,निवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल,शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसिबल आणि रात्री 40 डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांवर पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाई करणार आहे.सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ध्वनीक्षेपकांची फेरतपासणी आणि सर्वेक्षण होणार आहे.धव्नीक्षेपकाची परवानगी आपले सरकार वेब पोर्टलवरून घेता येणार आहे.