थरारक पाठलागानंतर व्हेल माशाच्या उलटीसह चौघांना अटक

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्या चौघांना वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले आहे. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे-पाचल रस्त्यावर हा प्रकार घडला. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार राजापूर तालुक्यातील पाचल-ताम्हाणे रस्त्यावर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी येणार असल्याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने पाचल ते ताम्हाणे मार्गावर सापळा रचला. दरम्यान, राजकुमार सुरेश शेलार (33), आकाश राजेद्र घाडगे (29) आणि रुपेश गणपत म्हात्रे (39) हे मोटारीतून व्हेल माशाच्या उलटीची खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जंगलात घुसलेल्या आरोपोंचा पाठलाग केला तर उर्वरित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोटारीचा पाठलाग केला. जंगलात पळून गेलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. मोटारीतील संशयित मात्र नेलेंमागें गगनबावडा, भुईबावडा दिशेने निघून गेले. परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याशी संपर्क केला. गगनबावडा पोलिसांशी संपर्क करून पळालेले संशयित व वाहनाविषयी माहिती दिली. गगनबावडा पोलिसांनी गगनबावडा येथे नाकाबंदी करून मोटारीसह संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी न्यायालयाने चोघांना १६ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत.