रत्नागिरीतील शिक्षकांचे महाराष्ट्र दर्शन फक्त बिलावर, मोठा भ्रष्टाचार होणार उघड

688

महाराष्ट्र दर्शन या योजनेचा फायदा उठविण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील शेकडो शिक्षकांनी भामरागड,गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात प्रवास केल्याची खोटी बिले सादर केली होती. योजनेतील पैसे लाटण्यासाठी शिक्षकांनी कागदावरच्या प्रवासाची बिले आता चौकशीच्या कचाट्यात सापडणार असल्याने महाराष्ट्र दर्शनच्या बिलांची पटवापटवी करणाऱ्या म्होरक्यांसह शिक्षकांची पाचावर धारण बसली आहे. नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत उपसभापती दत्तात्रय मयेकर यांनी महाराष्ट्र दर्शनच्या बीलांचे काय झाले? असा प्रश्न विचारून या प्रश्नाला वाचा फोडली आहे.जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील शिक्षकांनी भामरागड,गोंदियाचा कागदावरच प्रवास करून खोटी बीले सादर केल्याचा भ्रष्टाचार बाहेर पडण्याच्या उंबरठयावर आहे.

महाराष्ट्र दर्शन या योजनेतून शिक्षकांना आपल्या कुटुंबीयांसह महाराष्ट्रात कुठेही फिरता येते. त्याचा प्रवास खर्च रेल्वे आणि एस.टी.च्या तिकिटात निश्चित करण्यात आला आहे.मात्र शिक्षक स्वताची गाडी घेऊन गेल्यास त्यांना रेल्वे किंवा एसटीच्या तिकिट दरात खर्च दिला जातो.याचा फायदा उठवत शिक्षकांनी भामरागड,गोंदिया आणि वर्ध्याचे लांबचे ठिकाण निवडले. जास्त बिल मिळणार ही अपेक्षा होती मात्र शिक्षकांचे हे बिंग फुटले. स्वताचे वाहन नसलेल्या शिक्षकांनी ट्रॅव्हल्स एजन्सीची बीले जमा केली.जीएसटी नसलेली बीले आल्याने हे प्रकरणही उघडकीस आले.प्रवास न करता खोटी बीले सादर करून पैसे लाटण्याचा प्रकार पुढे आल्याने पंचायत समित्यांच्या लेखाविभागाने हि बीले धुडकावली आहेत.आता त्या बीलांचे काय होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या