
माहितीच्या अधिकारात अर्ज केल्यानंतर साधारण तीस दिवसात उत्तर अपेक्षित असताना एका जिल्हापरिषदेच्या सभापतीला माहितीच्या अधिकारातील अर्जावर उत्तर देण्यासाठी तब्बल पाच महिने तंगवले. आज शुक्रवारी रत्नागिरी जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सामान्य प्रशासनाचा अमान्य कारभाराबाबत शिवसेनेच्या सर्वच सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सामान्य प्रशासनाच्या कारभाराबाबत सर्व पक्षीय सदस्यांनी नाराजी व्यक्त करत चुकीच्या वर्तुणूकीचा पाढा वाचला.
जिल्हापरिषद बांधकाम सभापती असताना विनोद झगडे यांनी सभागृहात काही माहिती विचारला होती मात्र ती माहिती न मिळाल्याने त्यांनी सामान्य नागरिकाचा अधिकार वापरत माहितीच्या अधिकारात परिचरांच्या बदल्याबाबत आणि त्याबदल्या कशा पध्दतीने झाल्या? याबाबत माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. या अर्जावर त्यांना पाच महिन्यानंतर उत्तर मिळाले हि गोष्ट विनोद झगडे यांनी आज सभागृहात उघडकीस आणल्यानंतर अनेकांनी तोंडात बोटे घातली. सभापती, जिल्हापरिषद सदस्यालाच अधिकारी माहिती देत नसतील तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? हा प्रश्न अनेक सदस्यांनी उपस्थित केला. विनोद झगडे यांनी हा जिल्हापरिषद सदस्यांचा अपमान असून विभागप्रमुखावर कारवाई व्हावी अशी मागणी केली. संतोष थेराडे यांनीही सामान्य प्रशासनाच्या कामाविषयी नाराजी व्यक्त करताना जिल्हापरिषद सदस्याला सभागृहात माहिती दिली जात नसेल तर तो आमचा अपमान आहे.आम्ही इथे काय मग जेवायला येतो का? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.
सभागृहातील सदस्यांनीही सामान्य प्रशासनाकडून मिळणाऱ्या चुकीच्या वर्तुणूकीचा पाढा वाचला.याचवेळी डवरी प्रकरणाला सभापती महेश म्हाप यांनी वाचा फोडली. ते म्हणाले की डवरी प्रकरणाचा निकाल लागून तीन महिने झाले तरी त्यांना निकालाची प्रत दिलेली नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली. अध्यक्ष रोहन बने यांनी याप्रकरणाबाबत नाराजी करत सामान्य प्रशासनाने कारभारात सुधारणा आणावी अशी सूचना केली.
जलयुक्त शिवारचे पैसे परत गेले
जलयुक्त शिवारचे 57 लाख रूपये परत गेल्याने सभागृहात पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक सदस्याने त्यांच्या मतदारसंघातील विहिरींचे प्रस्ताव दिले असताना निधी परत कसा गेला? रत्नागिरी जिल्हा टंचाईमुक्त झाला का?असा सवाल संतोष थेराडे यांनी व्यक्त केला.





























































