
बापू सुळे । मुंबई
सरकारी वीज कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड या कॉर्पोरेट कार्यालयात सध्या उंदरांची ‘पॉवर’ आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांता कार्यालयात उंदरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे प्रकाशगड व्यवस्थापन (स्थापत्य) विभाग हैराण झाले आहे. त्यानुसार त्यांनी उंदीर हटाव मोहीम हाती घेतली असून कार्यालयातील जुने दस्तऐवज, रद्दी आणि जुने फर्निचर तत्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कॉर्पोरेट कार्यालयात वीज कंपन्यांची नव्हे तर उंदरांचीच पॉवर असल्याची चर्चा कर्मचार्यांमध्ये रंगली आहे.
महावितरण, महानिर्मिती या दोन सरकारी वीज कंपन्यांचे मुख्यालय वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड या इमारतीत आहे. सहा मजल्यांच्या या इमारतीत आठवडाभरापासून दुसऱया-तिसऱया कोणाची नव्हे तर फक्त उंदीरमामांचीच चर्चा आहे. इमारतीमधील रिकाम्या जागेत, उद्वाहनासमोरील जागेत ठिकठिकाणी संबंधित मजल्यावरच्या विभागांनी आपले जुन दस्तऐवज, रद्दी ठेवली असल्यामुळे सफाई कर्मचार्यांना साफसफाई करताना अडचणी येत आहे. त्यामुळे उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी हैराण झाले असून त्यांनी स्थापत्य विभागाकडे याबाबत तक्रारी केल्या आहेत. त्याची स्थापत्य विभागाने गंभीर दखल घेतली असून सदर साहित्य तत्काळ हटवण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार ते न हटवल्यास काढून टाकले जाणार असून होणाऱया नुकसानीला संबंधित विभाग जबाबदार राहील असे स्पष्ट केले आहे.
नवीन दस्तऐवजाला धोका
जुने दस्तऐवज, रद्दी आणि फर्निचरमुळे दैनंदिन सफाई व्यवस्थित होऊ शकत नसल्याने उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे कार्यालयातील नवीन फाइल्स, विद्युत यंत्रणेला कुरतडन्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थापत्य विभागाने लेखी आदेश काढून जुने साहित्य हटवण्याबरोबरच उंदीर हटाव मोहीम हाती घेतल्याचे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले.


























































