
हिंदुस्थानचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी ऑस्ट्रेलिया-हिंदुस्थान वन डे मालिकेला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कारकीर्दीतील निर्णायक टप्पा ठरवले आहे. त्यांच्या मते जर ही जोडी 2027 च्या विश्वचषकात खेळायची इच्छा बाळगत असेल तर या मालिकेत त्यांना फिटनेस, फॉर्म आणि खेळाची भूक दाखवावीच लागेल.
शास्त्राr पुढे म्हणाले, ही मालिका त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. सर्वकाही त्यांच्या फिटनेस आणि फॉर्मवर अवलंबून आहे. मालिकेच्या अखेरीस त्यांनाच ठरवता येईल की, ते कुठे उभे आहेत आणि पुढे खेळायचे की नाही. त्यांनी पुढे सांगितले, या वयात अनुभव मोठा घटक असतो, पण टिकतो तोच ज्याच्यात अजूनही खेळाची भूक आहे. मोठे सामने आले की मोठे खेळाडूच जबाबदारी घेतात, अनुभवाला पर्याय नाही, हे आपण चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाहिले आहे.
फिटनेस आणि तयारीवर भर
रोहित शर्मा अलीकडे बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे फिटनेस व फलंदाजीवर काम करत आहेत, तर विराट कोहली लंडनमध्ये खासगी प्रशिक्षण घेत आहेत. दोघांनाही 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी वन डे संघात स्थान मिळाले आहे.
सध्या कोहली (36) आणि रोहित (38) यांनी कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अलीकडच्या फॉर्ममधील चढउतारांमुळे त्यांच्या वन डे भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोघांचीही 2017 चा वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा असली तरी समाजातील इतर घटक त्यांच्याबाबत वारंवार टीका करून त्यांच्यावरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 2020-21 मधील शेवटच्या भेटीत हिंदुस्थानला वन डे मालिकेत 1-2 ने पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र त्याच मालिकेत टी–20 मालिकेत 2-1 ने विजय मिळवत दमदार पुनरागमन केले होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वन डे वेळापत्रक
- पहिली वन डे – 19 ऑक्टोबर, पर्थ स्टेडियम
- दुसरी वन डे – 23 ऑक्टोबर, ऍडलेड ओव्हल
- तिसरी वन डे – 25 ऑक्टोबर, सिडनी क्रिकेट ग्राऊंड