… तर रवी शास्त्री यांना प्रशिक्षक पद सोडावे लागणार

1810
ravi-shastri-bcci

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद धोक्यात आहे. बीसीसीआयने शास्त्री यांची ज्या क्रिकेट सल्लागार समितीने निवड केली त्यातील सदस्यांना परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस धाडली आहे. या नोटीशीला योग्य उत्तर मिळाले नाही, तर शास्त्री यांची निवड रद्द केली जावू शकते. तसे झाले तर पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने तयारीमध्ये असणाऱ्या टीम इंडियाला हा मोठा धक्का असेल.

इंग्लंडमध्ये रंगलेल्या एक दिवसीय विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा करार संपला होता. यानंतर प्रशिक्षकपदासाठी बरेच अर्ज आले होते, परंतु कपिल देव, अंशुमन गायकवाड, शांता रंगास्वामी यांच्या समितीने रवी शास्त्री यांच्या नावावर पुन्हा मोहोर उमटवली. परंतु आता या तिघांना बीसीसीआयने परस्पर हितसंबंध जपल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला 10 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. बीसीसीआयची नोटीस मिळाल्यानंतर शांता रंगास्वामी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. रंगास्वामी आणि इतर सदस्य या नोटीशीला योग्य उत्तर देऊ शकले नाही तर शास्त्री यांना प्रशिक्षक पदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे.

रंगास्वामी यांनी राजीनामा देताना म्हटले की, माझ्याकडे इतरही बरे कामं आहेत, त्यामुळे मी क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. परस्पर हितसंबंध जपल्याचे आमच्याबाबत बोलले जात आहे, परंतु जर असे होत राहिले तर एकही क्रिकेटपटू सल्लागार समितीमध्ये काम करू शकणार नाही. क्रिकेट सल्लागार समितीची बैठक वर्षातून फक्त दोन ते तीन वेळा होते त्यामुळे परस्पर हितसंबंध जपल्याचा मुद्दा येतच नाही.

काय आहे प्रकरण?
सल्लागार समितीतीमझील तिन्ही माजी क्रिकेटपटू यांच्यावर परस्पर हितसंबंध जपल्याचे बोलले जात आहे. बीसीसीआयमध्ये कोणताही व्यक्ती फक्त एकच पद भूषवू शकते, त्यापेक्षा जास्त पद भूषवले की परस्पर हितसंबंध जपल्याचे बोलले जाते. सल्लागार समितीचे सदस्य कपिल देव सध्या समालोचनही करत आहेत. बीसीसीआयशी समालोचन म्हणून त्यांचा करार आहे. त्याचसोबत फ्लडलाईट या कंपनीचे ते मालकही आहे, तसेच भारतीय क्रिकेटपटूंच्या संघटनेचे ते सदस्यही आहेत. कपिल यांच्याप्रमाणेच रंगास्वामी आणि गायकवाड हे देखील या संघटनेचे सदस्य आहेत. त्यामुळे यामध्ये परस्पर हितसंबंध जपले जात असल्याचा आरोप मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केला होता. त्यानंतर बीसीसीआयने या तिघांना नोटीस पाठवली.

आपली प्रतिक्रिया द्या